Wednesday, 25 June 2008

इतिहासातील कोकणी माणूस !!!!


इ. स. १६५७ ते ५८ दरम्यान कोकणातील स्वारीत शिवाजीराजांच्या नजरेस अनेक गोष्टी आल्या. काही सुखावणाऱ्या तर काही मिरचीसारख्या झोंबणाऱ्या त्यात राजांना जी कोकणी मनं आणि मनगटं गवसली , ती फारच मोलाची होती. मायनाक भंडारी , बेंटाजी भाटकर , दौलतखान , सिदी मिस्त्री , इब्राहिमखान , तुकोजी आंग्रे , लायजी कोळी सरपाटील आणि असे अनेक. आगरी भंडारी , कोळी , कुणबी , प्रभू , सारस्वत मंडळी महाराजांच्या या जागर- गोंधळात कर्तृत्त्वाचे पोत पेटवून राजांच्या भोवती हुकूम झेलायला अधीरतेन गोळा होऊ लागली. हे सारेच समाजगट खरोखर गुणी होते. शौर्य , धाडस , कल्पकता , निष्ठा पराक्रमाची हौस आणि उत्तुंग महत्त्वाकांक्षा या तरुणांच्या रोमरोमात उसळत होती. राजांनी या कोकणी चतुर काळसुंद्यांचा अचूक उपयोग करायच्या योजना आखल्या. कृतीतही आणल्या. या आगरी , कोळी , भंडारी पोरांचं काय सागरी अप्रूप सांगावं ? जन्मल्यावर यांना आधी समुदात पोहता येत होतं. अन् मग जमिनीवर रांगता येत होतं.
शिवाजीराजांच्या मृत्युनंतर औरंगजेबानं मराठी राज्य गिळून टाकण्याकरता अमाप दळवादळ घेऊन इथं स्वारी केली. पंचवीस वर्ष तो मराठी देशावर थैमान घालत होता. पण कोकणात किनारपट्टीचा एकही सागरी किल्ला अन् कोकणची वीतभर जमिनही औरंगजेबाला पंचवीस वर्षात जिंकता आली नाही. अजिंक्य! कोकण अजिंक्य , भंडारी अजिंक्य , आगरी अजिंक्य , कोळी अजिंक्य , समुद अजिंक्य , मराठी राज्य आणि मराठी ध्वज अजिंक्य. हे कर्तृत्त्व कोणाचं ? हे या कोकणी मर्दांचं. आणि आज याच माणसांना आम्ही मुंबईत ' रामागाडी ' म्हणून भांडी घासायला लावतोय. मॅक्सी अन् साड्या धुवून वाळत घालायला लावतोय. हॉटेलात कपबश्या विसळायला लावतोय. वास्तविक यांचा मान भारताच्या आरमारी नौकांवरून शत्रूवर तोफा बंदुकांनी सरबत्ती करण्याचा आहे. ही सारी मार्शल रेस आहे. शिवाजीमहाराजांनी तीनशे वर्षांपूवीर् हे ओळखलं. कोकण अजिंक्य बनवलं. आमच्या लक्षात केव्हा येणार ? ब्रिटीश विल्यम पिप्ससारखा एखादा कान्होजी आंग्रा , मायनाक भंडारी किंवा एखादा मराठी दौलतखान आम्हाला आज लाभेल का ?

Tuesday, 24 June 2008

मला आभिमान आहे मराठीचा !!!

मला आभिमान आहे कारण .......

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामानात दंग ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी
आमुच्या नसानसात नाच ते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

मी मराठी आहे कारण 31st december ला दणक्यात celebration केलं तरी गुढीपाडव्याला घरावर गुढी ऊभारून जीभेवर कडू-गोड गोळी ची चव चाखत मनापासून नवीन वर्षाचं स्वागत करतो..मी मराठी आहे कारण कॉलेज मधून येताना टाइमपास मंचुरियन खाऊन आलो तरी वरण भात आणि साजूक तुपाशिवाय माझं भागत नाही..मी मराठी आहे कारण रिकी मार्टिन च्या गाण्यावर माझे पाय थिरकले तरी बाबूजींचे 'तोच चंद्रमा नभात' ऐकल्यावर नकळतच तोंडातून 'वाह' निघून जातं..मी मराठी आहे कारण frnds सोबत cool outfits घालून धम्माल पार्टी केली तरी संक्रांत दस-याला मानचा फ़ेटा आणि धोतर घालून,तितक्याच उत्साहात नातेवाईकांच्या घरी जायला मला आवडतं..आम्ही मराठी आहोत कारण कितीही imported cosmetics- perfumes वापरले तरी त्या typical sandal साबणा शिवाय आणि उटण्या शिवाय आमची दिवाळी साजरी होऊच शकत नाही..आम्ही मराठी आहोत कारण वर्तमानपत्रांनी कितीही कृत्रिम रंगाविषयी लिहिलं तरी दिवसभर मनसोक्त रंग खेळल्याशिवाय एकही होळी जात नाही..आम्ही मराठी आहोत कारण प्रवासाला जाताना गाडीतून एखादं मंदिर दिसलं की नकळतच आमचे हात जोडले जातात..आम्ही मराठी आहोत कारण अगदी अत्याधुनिक home appliances ने घर सजवल तरी दाराला झेंडू च्या फुलांच आणि आंब्याच्या पानांचं तोरण लावल्या शिवाय समाधान होत नाही..ब्राम्हण क्षत्रिय वैश्य क्षुद्र..जात कोणतीही असो..आम्ही महाराष्ट्रीयन आहोत..आणि आमच्यातलं मराठीपण सगळीकडे तेच आहे..माझ्यातलं मराठीपण जोपासण्याची मला आवश्यकता नाही..कारण हे मराठीपण माझ्या रक्तात भिनलय..आणि या मराठीपणाचा मला अभिमान आहे..!!