Wednesday, 25 June 2008

इतिहासातील कोकणी माणूस !!!!


इ. स. १६५७ ते ५८ दरम्यान कोकणातील स्वारीत शिवाजीराजांच्या नजरेस अनेक गोष्टी आल्या. काही सुखावणाऱ्या तर काही मिरचीसारख्या झोंबणाऱ्या त्यात राजांना जी कोकणी मनं आणि मनगटं गवसली , ती फारच मोलाची होती. मायनाक भंडारी , बेंटाजी भाटकर , दौलतखान , सिदी मिस्त्री , इब्राहिमखान , तुकोजी आंग्रे , लायजी कोळी सरपाटील आणि असे अनेक. आगरी भंडारी , कोळी , कुणबी , प्रभू , सारस्वत मंडळी महाराजांच्या या जागर- गोंधळात कर्तृत्त्वाचे पोत पेटवून राजांच्या भोवती हुकूम झेलायला अधीरतेन गोळा होऊ लागली. हे सारेच समाजगट खरोखर गुणी होते. शौर्य , धाडस , कल्पकता , निष्ठा पराक्रमाची हौस आणि उत्तुंग महत्त्वाकांक्षा या तरुणांच्या रोमरोमात उसळत होती. राजांनी या कोकणी चतुर काळसुंद्यांचा अचूक उपयोग करायच्या योजना आखल्या. कृतीतही आणल्या. या आगरी , कोळी , भंडारी पोरांचं काय सागरी अप्रूप सांगावं ? जन्मल्यावर यांना आधी समुदात पोहता येत होतं. अन् मग जमिनीवर रांगता येत होतं.
शिवाजीराजांच्या मृत्युनंतर औरंगजेबानं मराठी राज्य गिळून टाकण्याकरता अमाप दळवादळ घेऊन इथं स्वारी केली. पंचवीस वर्ष तो मराठी देशावर थैमान घालत होता. पण कोकणात किनारपट्टीचा एकही सागरी किल्ला अन् कोकणची वीतभर जमिनही औरंगजेबाला पंचवीस वर्षात जिंकता आली नाही. अजिंक्य! कोकण अजिंक्य , भंडारी अजिंक्य , आगरी अजिंक्य , कोळी अजिंक्य , समुद अजिंक्य , मराठी राज्य आणि मराठी ध्वज अजिंक्य. हे कर्तृत्त्व कोणाचं ? हे या कोकणी मर्दांचं. आणि आज याच माणसांना आम्ही मुंबईत ' रामागाडी ' म्हणून भांडी घासायला लावतोय. मॅक्सी अन् साड्या धुवून वाळत घालायला लावतोय. हॉटेलात कपबश्या विसळायला लावतोय. वास्तविक यांचा मान भारताच्या आरमारी नौकांवरून शत्रूवर तोफा बंदुकांनी सरबत्ती करण्याचा आहे. ही सारी मार्शल रेस आहे. शिवाजीमहाराजांनी तीनशे वर्षांपूवीर् हे ओळखलं. कोकण अजिंक्य बनवलं. आमच्या लक्षात केव्हा येणार ? ब्रिटीश विल्यम पिप्ससारखा एखादा कान्होजी आंग्रा , मायनाक भंडारी किंवा एखादा मराठी दौलतखान आम्हाला आज लाभेल का ?

2 comments:

shritej said...

history favourite subject

Kiran bhalekar said...

लय भारी