!!! भेटी लागे जीवा !!!
तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली !
वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली !!
गळाभेट घेण्या भिमेची निघाली तुझ्या नामघोषात इंद्रायणी !!
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली !
तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली ?
जरी बाप सार्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माउली !!
माउली माउली माउली माउली माउली माउली रूप तुझे !!!
वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली !!
गळाभेट घेण्या भिमेची निघाली तुझ्या नामघोषात इंद्रायणी !!
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली !
तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली ?
जरी बाप सार्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माउली !!
माउली माउली माउली माउली माउली माउली रूप तुझे !!!
नमस्कार माउली
पंढरीचे लागले ध्यान रात्रंदिन, लाखो श्रद्धाळू भाविकांना पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली असते आणि दरवर्षी आषाढी एकादशी ला पंढरपुरी जाण्यासाठी वारकरी आळंदी वरून ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी बरोबर पायी चालत निघतात
वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यातील वारीला जात होते. पूर्वी प्रवासाची साधने फारशी नव्हती. त्यामुळे लहान लहान समूहाने लोक पंढरपूरला जात असत.
जगाच्या इतिहासात इसवीसन १३ व्या शतका पासून आज पर्यंत अखंडित सुरु असणारी वारी हि एकमेव प्रथा असेल. वारी म्हणजे महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक अधिष्ठान .
ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी असलेल्या हैबतराव बाबा आरफळकर यांनी या दिंड्यामध्ये सूसुत्रता आणली. ते ज्ञानेश्वराच्या पादुका पंढरपूरला घेऊन जात असत अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात, कथा करीत पंढरपूरला पायी जातात तेव्हा त्यांच्या समूहाला ‘दिंडी’ असे म्हणतात.
तुकाराम महाराजही पंढरपूरची वारी करत असत. त्यांच्या चिरंजीवांनी नारायण महाराजांनी सन १६८५ साली श्रीतुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूराला घेऊन जाण्याची प्रथा सुरु केली. दिंडी सोहळ्याच्या या दोन परंपरा चालत आलेल्या आहेत.
ह्या वर्षी २० जून ला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी वरून निघाली आणि ८ जुलै ला माऊलींचा पंढरपूर ला आगमन होणार . दोन वर्षापूर्वी अतुल आणि मी पुणे ते सासवड असा वारी बरोबर प्रवास केला गतवर्षी सासवड ते जेजुरी ते वाल्हे वारी सोबत मुक्काम झाला ह्या वर्षी पुढील टप्पा वारी बरोबर जाण्याचे ठरवले होते .
२८ आणि २९ जून शनिवार - रविवार वारीचा मुक्काम लोणंदला होता आणि लोणंद ते तरडगाव वारीचा प्रवास होता त्याच बरोबर रविवारी तरडगाव येथे सदाशिवनगरला उभं रिंगण पण होतं
शनिवार २८ जून ला पुण्यातून निघून लोणंदला जायचं तिथे वारीसोबत मुक्काम करून रविवार वारी बरोबर तरडगाव पर्यंत पायी जायचं आणि उभे रिंगण पाहून पुन्हा परत यायचं असा आमचा बेत ठरला . वारीची तयारी झाली . रात्री वस्ती साठी लागणारा पोर्टेबल तंबू व्यवस्थित आहे कि नाही पहिला .
लोणंद जेजुरी फलटण रस्त्यावरील एक गाव . ज्या ठिकाणी वारीचा मुक्काम असतो त्या मार्गावरील सर्व वाहतूक बंद असते तर लोणंद च्या अलीकडे नीरा गाव आहे तेथे अतुल चे नातेवाईक राहतात त्यांचे कडे गाडी ठेवून पुढे लोणंदला जायचे ठरवले
मागील वर्षी आम्ही सासवड जेजुरी ते वाल्हे असा प्रवास केला होता. वाल्हे येथून सासवड कडे परत येताना वाटेवर अतुल ने त्याचा हरिणे गाव दाखवलं होतं . ह्या वर्षी नीरा गावी जाताना हरीणे गाव लागणार होतं अतुलची पत्नी नंदिनी त्याची मुले अर्णव आणि श्रावणी आणि आई वडील आमच्या बरोबर येणार होते त्यांना गावी सोडून पुढे वारी करिता जाण्याचे ठरले
शनिवार २८ जून सकाळी अतूल कडे पिंपरीला गेलो . अतुल आणि त्याची फॅमिली आम्ही सगळे हडपसर दिवाघाट मार्गे पालखी मार्गावरून निघालो . सासवड मधून बाहेर पडल्यावर जेजुरी कडे जाण्याच्या रस्त्याला हरीणे - वाल्ह्या कडे जायचा रस्ता लागतो . रस्ता निमुळता आहे पण सुस्थितीत आहे. अतुलनेच सांगितलं वाटेल सथनिक आमदाराचे गाव आहे म्हणून रस्ता चांगला आहे :-)
दुपारी हरिणे गावी पोचलो . गावात शिरतानाच एक मोठा वडाच्या झाडाचा पार लागतो जुन्या मराठी चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या गावातल्या चावडी किंवा पारा सारखा अगदी तसाच मला वाटला, मला फोटो काढायचा होता पण राहून गेलं . अतुल च्या घरी पोचलो त्याच्या काकूने जेवण बनवून ठेवलाच होत . बाजरीची भाकरी, चवळीची आमटी भात मस्त जेवलो आणि लगेचच अतुल आणि मी वाल्ह्या वरून नीरेकडे निघालो . रामायणाची रचना करणारे समर्थ वाल्मिकींचे हेच ते वाल्हे गाव
पालखी मार्गावर नीरा गावाचे पण महत्व आहे . वाल्हे कडून लोणंद कडे जाताना माऊलींची पालखी नीरा गावी विसावा घेते आणि श्री ज्ञानदेव दत्त घाटात नीरा नदीत स्नान करून सातारा जिल्यात लोणंदकडे प्रवेश करतात . इंद्रायणी आणि चंद्रभागा ह्या नद्यान व्यतिरिक्त फक्त नीरा नदीतच माऊलींचे स्नान होते. माऊलींच्या ह्या स्नानाने जणू नीरा नदीनच पावन होते
दुपारी तीन वाजता अतुलच्या नातेवाईकांच्या घरी गाडी पार्क केली आणि आम्ही लोणंद कडे निघालो . लोणंदला पालखीचा मुक्काम असल्यामुळे मुख्य वाहतूक बंद होती आम्हाला सिक्ससीटर मिळाली , बोलायला नुसती सिक्ससीटर लोणंदला जायला दुसरी काही वाहन नसल्यामुळे माऊलींच्या दर्शनाला लोणंदला जाणारे बरेच प्रवासी होते. ह्या सिक्ससीटर मध्ये मी मोजले २० प्रवासी भरले होते … भरले काय कोंबले होते :-)
वाल्ह्या वरून लोणंद ला आल्यावर माऊलींचा पूर्ण दिवस मुक्काम लोणंद ला असतो
१५-२० मिनिट मध्ये लोणंदला पोचलो , गावात जाण्याचा रस्ता वाहनांसाठी बंद होता, थोडा आधी उतरून चालत लोणंदला आलो . आम्हाला आमच्या नेहमीच्या दिंडी क्रमांक ५५ च्या ठिकाणी जायचं होतं . माझा मित्र दत्ता त्याचे बाबा दरवर्षी वारीला येतात ते ह्या दिंडी मध्ये आहेत त्यांना फोन केला आणि दिंडीचा मुक्काम कुठे आहे विचारलं . आधी माऊलींचा लोणंद मध्ये मुक्काम आहे तिथे जावून आलो . दर्शनाला खूप मोठी रांग होती . नंतर माऊलींच्या रथाबरोबरच प्रवास करणार होतो म्हणून दर्शनासाठी रांगेत उभे न राहता आमच्या दिंडीचा मुक्काम शोधायला निघालो . शेकडो दिंड्या आणि लाखो भाविक , नवीन जागा . दत्ताच्या बाबांनी जी जागा सांगितली तिथे ते दिसतच नव्हते . शेवटी एक तास फिरून आमची भेट झाली . ते दिंडी क्रमांक ५५ च्या मुक्कामाच्या जागी घेवून गेले
दोन वर्ष ह्या दिंडी बरोबर वारी मध्ये येत आहोत त्यामुळे बऱ्याच जणांशी ओळख झाली आहे . ह्यावर्षी पेण आणि अलिबाग भागातील ५०-६० वारकरी दिंडी मध्ये सहभागी झाले आहेत . सगळ्यांची भेट घेतली त्यांना पण दोन दिवस का होईना आम्ही वारी मध्ये सहभागी होतो ह्याचा आनंद होतो . आज मुक्कामाचा दिवस त्यामुळे सर्वांनी आराम केला होता संध्याकाळी नाश्त्याला बटाटेवडे बनवले होते आम्ही गेल्यागेल्या गरमागरम बटाटेवडे दिले . चवीला खूपच छान होते वडे आमच्या पेण च्या हरीच्या बटाटेवड्याची आठवण झाली :-)
दिंडीच्या ट्रक मध्ये आमचं सामान ठेवलं, थोडं आराम करून आम्ही इतर दिंड्या बघायला बाहेर पडलो
आता ऊन थोडी मावळतीला लागली होती . सर्व दिंड्या मध्ये भजन , कीर्तन भारुड आणि काही खेळ सुरु होते . ते बघत आणि दिंडी मधील लोकांचे अनुभव ऐकत फोटोग्राफी सुरूच होती . पालखीचा मुक्काम असल्यामुळे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भाविक माऊलींच्या दर्शनासाठी लोणंदला येत होते त्यामुळे आज लोणंद मध्ये जत्रा भरल्याच रूप आल होते . खेळणी , मिठाई इतर साहित्य असे बरेच स्टोल्स लागले होते.
रात्री ७-७:३० वाजता पुन्हा दिंडीच्या मुक्कामी आलो . आमचा टेंट बसवला . ह्या तंबूचा वारीतील लोकांना बराच अप्रूप वाटत. बरेच जण हा काय प्रकार आहे बघायला येतात माहिती विचारतात स्वतः बद्दल सांगतात ह्या तंबू मुळे दोन वर्षात खूप साऱ्या वारकर्यांशी गप्पा मारता आल्या वारी बद्दल नवनवीन माहिती विचारता आली लोकांचे अनुभव ऐकायला मिळाले
एक २७-२८ वर्षाचा तरुण मुलगा तंबू बघून विचारायला आला तो सांगत होता त्याची आई गेली २२ वर्ष वारीला यायची पण नंतर वयोमानामुळे त्यांना येणं शक्य होत नव्हता तर आता हा मुलगा नेमाने वारीला यायला लागला , खूप चांगला पखवाज वाजक आहे त्यामुळे दरवर्षी कोणत्या नी कोणत्या दिंडीत सहभागी होतो . तोच सांगत होता मागील वर्षी त्याच्या पायाला खूप लागलं होतं नीट चालू शकत नव्हता पण त्यास्थितीत पण त्याने वारी पूर्ण केली . एक वाक्य बोलून गेला तो आणि माझ्या मते सर्व वारकर्यांच्या मनातला बोलला … कधी त्रास होतो काही प्रोब्लेम्स येतात पण ती ज्ञानोबा माऊली काळजी घेते.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा मध्ये अगदी फिक्कट रेषा आहे देव आपल्याला काही देईल आणि त्यासाठी काही करावा हि झाली अंधश्रद्धा पण आपण काहीही न मागता ती माऊली आपली काळजी करते हा विश्वास वाटणं हि आहे वारकर्यांची निस्सीम भक्ती आणि अपार श्रद्धा
थोड्याफार गप्पा झाल्या ९ वाजले आज वारकर्यांन बरोबरच गरमागरम वरण भात चवळीची भाजी सोबत पापड चटणी आणि आग्रहाचं वाढणं पोटभर जेवलो . दिंडी बरोबर लाईट ची थोडीफार सोय असते पण ती पुरेशी नसते . एक वारकरी म्हणाले आमच्या साठी नवीन तंत्रज्ञानाने लाईट ची काही सोय करता येईल का ? अतुल आणि मी विचार करू लागलो खरंच असा काही करता येईल का solar power वर चालणार काही स्वस्तात बनेल असा काही उपकरण ज्याचा वारकरी रात्री उपयोग करू शकतील . हा Blog वाचणाऱ्याला काही अशी कल्पना सुचली तर अतुल आणि मला नक्की सपर्क करा
आता जवळपास सर्वच दिंड्यांमधील जेवणं आटोपली होती आणि सगळी कडून भजन कीर्तनाचे आवाज येत होते . पूर्ण भक्तिमय आसमंत . आमच्या दिंडी मध्ये पण ह . भ . प . (हरी भक्त परायण ) श्री माधव महाराज , परभणी यांचं कीर्तन होते .त्यांनी तुकाराम महाराजांचे अभंग अगदी सोप्या शब्दात वेगवेगळ्या कथा सांगून तुकारामांनी सांगितलेल्या नामस्मरणाचे महत्व सांगितलं, सर्वसामान्य वारकऱ्याला समजेल अश्या शब्दात प्रबोधन केले
रात्री चे ११:३० झाले होते आता सर्व मंडळी झोपायला त्यांच्या तंबू मध्ये गेली . आम्ही पण आमच्या तंबू मध्ये येवून झोपून गेलो
रविवार दि २९ जुन - पहाटे ५:०० - लवकरच जाग आली . पहाटेचे भजन आणि अभंग सुरु झाले होते . मागील वर्षीच्या Blog मध्ये मी दिंडीतील तंबू , राहण्याची व्यवस्था ह्या बद्दल थोडंफार लिहिल होता तर आता त्या बद्दल पुन्हा लिहित नाही
हि ५५ क्रमांक् ची दिंडी आळंदी चे श्री प्रेमानंद महाराज काढतात, सकाळी त्याचं दर्शन घेतलं . माऊलींची पालखी दुपारी लोणंद वरून तरडगाव कडे निघते त्यामुळे वारकरी लोणंद मधेच दुपारचं जेवण घेऊन निघतात.
आम्ही आता दिंडी वरून निघून माऊलींच्या मुख्य पालखी तळावर आलो . आजहि दर्शनासाठी बरीच रांग होती . पालखी समोरच्या पटांगणात छान कीर्तन सुरु होतं , बाजूलाच माऊलींच्या पालखीचा रथ सजवला होता . त्या बाजूला माऊलींचे अश्व उभे होते . पालखीचं दर्शन घेवून येणारे भाविक पुढे माऊलींच्या रथाला आणि अश्वांना नमस्कार करून जात होती . इथेच आम्हाला एक नवीन मित्र मिळाला विनायक साठे हा सकाळीच पुण्याहून पालखी सोहळा बघायला बस ने आला होता .
वारी मध्ये कोणीच लहान थोर नाही सगळ्यांच एकच नाव "माऊली" सगळे एकमेकांना नमस्कार करतात . मी कॅमेरा घेवून काही फोटो काढत होतो . एक खूप वयस्कर आजोबा दिसले त्यांचा फोटो काढला नमस्कार माऊली बोलून त्यांच्या पाया पडलो तर ते पण माझ्या पाया पडले . वारी मध्ये वय गरीब-श्रीमंत, जात-पात असे काहीच भेद नाहीत सर्व समान सर्वान मध्ये त्या पांडुरंगाचा वास आहे हि भावना आहे . साधा १००-२०० चा जमाव एकत्र आला तरी वादविवाद गोंधळ निर्माण होतं इथे वारी मध्ये ४-५ लाख वारकरी असूनही सगळं सुरळीत चालत . समानता आणि बंधुभाव हीच त्या मागची प्रेरणा आहे . समानता आणि बंधुभाव हे नुसते विचार नसून त्याचा जर अनुभव घायचा असेल तर एकदा तरी वारीला नक्की जायला हवं
माऊलींची पालखी निघायला अजून थोडा वेळ होता आम्ही तिघांनी थोडा नाश्ता करून एका झाडाच्या सावलीत विश्रांती घेतली
दुपारी १ वाजता - माऊलीची पालखी लोणंद वरून तरडगाव कडे निघाली . लोणंद ते तरडगाव जवळपास ८-१० किमी चा पल्ला . आम्ही आता थोडा वेळ माउलींच्या रथासोबत चालून दिंडी क्रमांक ५५ मध्ये जावून मिळालो
जसं आधी सांगितल्या प्रमाणे प्रत्येक दिंडी चा एक क्रमांक असतो आणि रथा मागे किंवा रथापुढे आपल्या क्रमांका नुसार दिंडी चालत असते
माऊलींच्या पादुका
माऊलींचा रथ
ह्या वर्षी पाऊसाला अजून सुरुवात नाही . रणरणत्या उन्हात वारीसोबत आम्ही चालत होतो . भजन कीर्तन आणि हरिनामाच्या गजरात चालताना त्रास जाणवत नाही . प्रत्येक दिंडीचा क्रमांकाचा बोर्ड घेवून एक वारकरी सगळ्यात पुढे असतो (अतुल ने थोडा वेळ आमच्या दिंडी चा बोर्ड धरला होता ) त्याच्या बाजूला भागवत धर्माची पताका भगवा झेंडा घेवून झेंडाकरी असतात . त्यांच्या मागे पखवाज वाजवणारा आणि टाळकरी त्यांच्या मागे दिंडीच्या माधोभागी वीणा घेऊन दिंडीचे महाराज असतात त्यांच्या सोबत तुळशी घेवून एक स्त्री असते मागे पाणी घेवून हंडाकरी असते आणि त्यामागे बाकी वारकरी स्त्रिया भजन कीर्तन करीत असतात
तरडगाव थोडं जवळ आल्यावर आम्ही दिंडी सोडून पुढे रिंगण होणार आहे त्या जागी पुढे निघून आलो . उभे रिंगण बघायला बरीच गर्दी जमा झाली होती . मोक्याच्या जागांवर सर्व Media च्या vans आधीच उभ्या होत्या
आम्ही पण रिंगण बघायला मिळेल ह्या आशेन दूरवर एका ट्रक च्या छतावर चढलो . माझ्या कडे SLR असल्याचा एक फायदा होता बऱ्याच जणांना आम्ही News Media किंवा News Paper चे वार्ताहर वाटायचो आणि कुठेही जायला मिळायचं
दोन प्रकारचे रिंगण होतात उभे रिंगण आणि गोल रिंगण . तरडगाव ला उभे रिंगण असते पुढे वाक्री ला गोल रिंगण असते ते खूप मोठं असतं . रिंगण चं महत्व काय आहे किंवा ती प्रथा काय आहे हे काही जेष्ठ वारकर्यांकडून जाणून घायचा प्रयत्न केला पण विशेष अशी काही माहिती नाही मिळाली . वारकर्यांना विरंगुळा म्हणून एक खेळ म्हणून हि प्रथा सुरू झाली असावी .
उभे रिंगण मध्ये सरळ रस्त्यावर पुढे चोपदार आणि त्याचा घोडा आणि मागे माऊलींचा एकटा घोडा भरधाव धावत सुटतात आणि माऊलींचा घोडा चोपदाराच्या घोड्याला मागे टाकून पुढे निघून जातो आणि माऊलींच्या पालखी जवळ जाऊन माऊलींना प्रणाम करतो
हातात भगव्या पताका, टाळृ-मृदुंगाचा गजर आणि वारकऱ्यांच्या ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने सारा रिंगण परिसर दुमदुमून गेला रिंगण सोहळा संपन्न होताच आश्वाच्या पायाखालची माती आपल्या भाळी लावण्यासाठी
भाविकांनी एकच गर्दी केली व या भक्तीमय क्षणी हरीनामाचा गजर केला.
रिंगण सोहळा संपन्न झाल्यावर आता आम्ही इथूनच तरडगाव वरून विठूरायाला वंदन करतो आणि महाराष्ट्रावरील दुष्काळाच सावट जाऊन लवकरच पाऊसाला सुरुवात होउदे अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना करून परतीच्या मार्गाला लागतो
पालखी मार्गावर वाहतूक पूर्ण थांबवली असते त्यामुळे आम्हाला तरडगाव वरून लोणंद कडे परत येण्यासाठी कोणताच वाहन मिळालं नाही . पुन्हा परतीचा पायी प्रवास आता मात्र पाय भयंकर दुखायला लागले होते . हळू हळू करत पुन्हा लोणंदला आलो . लोणंद वरून एक वडाप मधून नीरे ला आलो. नीरे मध्ये अतुल च्या नातेवाईकांकडे चहा घेतला थोडी तरतरी आली आणि पुन्हा हरणी कडे जायला निघालो . अतुलच्या फॅमिली घेवून लगेच पुण्याकडे निघायचं होतं
रात्री ७:३० च्या सुमारास अतुलच्या गावी पोचलो . वारीवरून आलो म्हणून अतुल च्या आईने पाय धुतले निरांजनाने ओवाळले . प्रत्येक भाविकाची धारणा आहे कि वारी मध्ये प्रत्यक्ष पांडुरंग वावरत असतो आणि वारी करून येतो त्याला पांडुरंगाचा सहवास प्राप्त झालेला असतो आम्ही लहान असून अतुल चे आई बाबा काकू आमच्या पाया पडले आम्ही त्यंच्या पाया पडलो . वारी हि महाराष्ट्राची संस्कृती आहे परंपरा आहे.
अतुल च्या घरी थोडा विसावा घेवून आता आम्ही पुण्याकडे निघालो . रात्रीचे ८:०० वाजले होते गावाकडील छोटा रस्ता, शांत काळोख आणि समोरच आकाशात नुकताच उमललेली प्रतिपदेची सुंदर चंद्रकोर अगदी श्री महादेवाच्या मस्तकावरील भासत होती
काल येताना मी अगदी गाडी जोरात पळवत आणली होती आज रात्री जाताना अगदी सावकाश जायचं नंदिनी ने सांगितलं होतं :-)
रात्री ११:३० वाजता पुन्हा एक वारीचा नवीन सुखद अनुभव घेवून पुण्याला घरी आलो
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज कि जय
वारी मधील आणखी काही फोटो :
https://picasaweb.google.com/106156735915030488638/Wari2014?authkey=Gv1sRgCOmk_4mP7I3A-QE&noredirect=1
http://youtu.be/G74tzX2L_QM
किशोर केशव झेमसे (zemasekk@gmail.com)
अतुल यादव (atul.yad@gmail.com)