Friday, 13 June 2014

शिवराज्याभिषेक सोहळा

३४१ वा शिवराज्याभिषेक सोहळा 




 
निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥

परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी ।
तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥

यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥

इसवी सन १२९४ - रामदेवराव यादव देवगिरी वरून राज्य करीत होते, महाराष्ट्रावर वर्षातील बाराही पोर्णिमा सुखाचे चांदणे शिंपीत होत्या पण ह्या सुखाला नजर लागली होती एका सैतानी पठाणाची "अर्जे मामालिक अल्लाउद्दिन खलजी" . एक महाभयंकर कर्दनकाळ . ह्या अल्लाउद्दिन खलजी ने यादवांच्या देवगिरीवर आक्रमण केले. मराठ्यांचे प्रचंड पराभव झाला उरल्यासुरालेल्यांची कत्तल करून खिलजी अमाप संपत्ती लुटून गेला आणि महाराष्ट्रवर परकीयांचे असुरी कालचक्र सुरु झाले

इसवी सन १६३० ह्या गुलामगिरी ने पिचलेल्या महाराष्ट्रात भोसले घराण्यात तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला आणि जेष्ठ शु त्रयोदशी शके १५९६ म्हणजेच  दिनाक ६ जून १६७४ रोजी शिवराज्याभिषेक झाला, शिवाजी महाराज छत्रपती झाले ३५० वर्षाची काळरात्र संपून महाराष्ट्र स्वतंत्र झाला स्वराज्य आलं सुराज्य आलं

दरवर्षी ६ जून आणि तिथी प्रमाणे जेष्ठ शु त्रयोदशीला रायगडावर हा  शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो . बऱ्याच वर्षांची इच्छा होती एकदा रायगडावर जावून शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी व्हावे
ह्या वर्षी ११ जून ला तिथी प्रमाणे हा सोहळा रायगडावर होणार होता. इतिहास संशोधक, शिवाई हाईकर्स आणि दुर्गराज रायगड शिवराज्याभिषेक  समितीचे सदस्य श्री संतोष चंदने  ह्यांना विचारले राज्याभिषेक सोहळ्याला जाणार आहात का त्यांनी त्यांच्या सोबत यायला सांगितलं आणि १० जून ला रायगड जाण्याचं ठरलं. संतोष बरोबर त्यांचे काही सहकारी होते
१० जून ला सकाळी ७:३० वाजता आम्ही ७ जण रायगड जाण्यासाठी पुण्यातून निघालो. ताम्हणी घाट - निजामपूर - माणगाव मार्गे ११:३० वाजता पाचाड ला पोचलो . तेथे देशमुख खाणावळी मध्ये जेवण करून दुपारी १२:३० वाजता किल्ले रायगड चढायला सुरुवात केली
रायगडला जवळपास १८०० पायऱ्या आहे चित दरवाजा  आणि नंतर मुख्य हत्ती दरवाज्या मार्गे किल्ला वर जाण्याचा मार्ग आहे . आम्ही मुख्य मार्गावरून न जाता नाना दरवाज्यातून पायवाटेने किल्ला चढायला सुरुवात केली .

नाना दरवाजा 

त्याकाळी शिवराज्याभिषेक सोहळ्याला इंग्रजांचा प्रतिनिधी हेन्री आक्झींडेन ह्याच नाना दरवाज्यातून रायगडावर गेला होता.
भर दुपारी रणरणत्या उन्हात गड चढायला सुरुवात केली होती तप्त उन्हाने अंगाची लाहीलाही होत होती जिथे सावली मिळेल तिथे विसावा घेत मार्गक्रमण सुरु होतं, मुख्य रस्ताने न आल्यामुळे एक बर झाला निम्म्या पायऱ्या लागल्या नाहीत आणि हा थोडा जवळचा मार्ग होता
पुढे जावून मशीद मोर्चा लागला इथेच मदारी मेहतर ची समाधी आहे .

मदारी मेहतर समाधी 

हाच मदारी मेहतर महाराजांबरोबर आग्र्याच्या नजर कैदेत होता. इथे थोडा विसावा घेवून आम्ही मुख्य दरवाज्या जवळ मुख्य रस्त्याला आलो

रायगड चा हा गोमुखी मुख्य दरवाजा स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. अगदी जवळ जाई पर्यंत दरवाज्या दिसत नाही त्यामुळे शत्रूला दरवाज्यावर सरळ मारा करता येत नाही त्याच प्रमाणे वक्राकार भिंती मुळे हातघाई च्या लढाई ला जास्त शत्रू सैन्याला दरवाज्य जवळ येता येत नाही त्याच प्रमाणे दरवाजा धडक मारून पाडणं पण कठीण होतं



प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस गोब्राह्मण प्रतिपालक हिंदूपतपादशहा  सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज. श्रीमंतयोगी छत्रपती श्री.शिवाजी महाराज कि जय

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय असा जयजयकार करून मुख्य दरवाज्यातून आत आलो.

 

 

रायगडची भव्य तटबंदी टकमक टोक ह्याच विहंग दर्शन होत. महाराजांनी रायगड इतका मजबूत गड बांधला होता कि शत्रूला युद्धात हा गड कधीच जिंकता नसता आला. संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर सूर्याजी पिसाळ ने फितुरी करून शत्रूला गडाचे दरवाजे उघडून दिले म्हणून हा किल्ला मुघलांच्या ताब्यात आला

गड चढताना मध्ये बऱ्याच ठिकाणी लिंबू सरबत ताक मिळतं . उन्हात निथळून गेलो होतो लिंबू सरबत घेवून थोडी तरतरी आलो . बरोबर तीन तास चालल्यावर ३:३० वाजता आम्ही गडावर पोचलो. पहिलेच लागतो तो हत्ती तलाव त्याच्याच बाजूला रायगड जिल्हापरिषद चं गेस्ट हाउस आहे . दोन दिवस सर्व शिवभक्तांसाठी इथे जिल्हा परिषदे वतीने मोफत जेवणाची सोय केलेली असते. गडावर काही धनगरांची थोडी झोपडीवजा घरं अश्याच एका झोपडीत आम्ही राहायची सोय केली तिथे जावून सामान ठेवलं आणि थोडा वेळ आराम केला

ह्याच दरम्यान गाड्वर शिक्राई देवी आणि जगदीश्वर मंदिर मध्ये पूजा सुरु होती

थोडावेळ आराम करून मुख्य सदरेवर आलो. इथे महारजांच्या मूर्ती ची तुला होणार होती. मिठाई, फळे, सुकामेवा, पुस्तके अश्या वस्तूंनी महाराजांची तुला करण्यात आली. आम्ही पण खाडी साखर आणि शेंगदाणे ह्याने महाराजांची तुला केली नंतर तुले मधले सगळे जिन्नस प्रसाद म्हणून गडावर सगळ्या शिवभक्तांना वाटला जातो.

 

तुला झाल्यावर काही ग्रुप्स ने मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. ते पाहिल्यावर आम्ही गड पहायला निघालो आधी टकमक टोकावर गेलो. टकमक टोक म्हणजे एक प्रचंड सुळका आहे खाली भयंकर दरी, मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचा इथून कडेलोट करण्यात येत असे

टकमक टोक


टकमक टोकावरून नंतर आम्ही जगदीश्वराच्या मंदिरात गेलो. तिथेच बाजूला महाराजांची समाधी आहे आणि महाराज्यांच्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा

हिरोजी इंदुलकरांनी  फक्त ६ वर्षात असा अभेद्य गड बांधला महाराजांनी खुश होऊन हिरोजींना काय बक्षीस देवू विचारलं तेंव्हा हिरोजींनी काहीही न मागता अशीच सेवा करण्यास मिळावी अस सांगितले
जगदीश्वराच्या पायरी वर "सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुरकर" असा कोरलेलं दिसतं

 


गड पाहून पुन्हा झोपडीवर आलो थोडा वेळ आराम केला . रात्रीचं जेवण झालं गरमागरम तांदळाची भाकरी आणि पिठलं. जेवून पुन्हा सदरेवर आलो पोवाडा, देवीचा गोंधळ असे कार्यक्रम सुरु होते . आता बरेच शिवभक्त गडावर आले होते . पाऊस बिलकुल नव्हता त्यामुळे सर्वांनी बाजारपेठ आणि होळीच्या माळावर तंबू टाकून राहायची सोय केली होती

आम्ही सुद्धा आमच्या झोपडीत परत आलो , थंडगार सोसाट्याचा वारा सुटला होता. रमेश ठोंबरेनी एका कवितेत चंद्रमोळी असा उल्लेख केलाय अशाच चंद्रमोळी मध्ये पिठूर चांदण्यात झोपी गेलो. रात्र होई पर्यंत सदरे वरून कार्यक्रमाचे आवाज येत होते . पहाटे ४:०० वाजता जय भवानी जय शिवाजी अशा शिवप्रेमी च्या जयजयकारात जाग आली . बरेच शिवभक्त रात्री निघतात आणि पहाटे २-३ वाजता गड चढायला सुरुवात करतात आणि सकाळी ५-६ पर्यंत राज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्य साठी गडावर पोचतात

आम्ही पण ५ वाजता उठून झब्बा फेटा असा मराठमोळा पेहराव करून सदरेवर पोचलो. ह्या वर्षीचा अभिषेक आमचे बदलापूरचे मित्र अजिंक्य हाईकर्स आणि कोकणकड्याचे सदस्य श्री   सुनील कदम ह्यांच्या हस्ते होणार होता . पवित्र मंत्रघोषात दुध दही लोणी आणि पवित्र नद्यांच्या पाण्याने महाराजांचा अभिषेक झाला शिवाजी महाराज कि जय अश्या शिवभक्तांच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता .

शिवराज्याभिषेक 


ह्या सोहळ्याला रायगड जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष, महाड चे आमदार श्री भारत गोगावले, भिवंडी चे आमदार श्री रुपेश म्हात्रे आणि ठाण्याचे महापौर श्री हरिश्चंद्र ठाकूर आवर्जून उपस्थित होते. अमाप जनसमुदाय हा सोहळा बघण्यासाठी लोटला होता.

बऱ्याच शिवप्रेमिंकडे पारंपारिक हत्यारं होती कोणी तलवार कोणी भाला कानी दांडपट्टा घेवून आले होते . आमच्या कडे पण एक खांड होती खांड म्हणजे तलवारी सारखच हत्यार ह्याची पात अगदी सरळ असते, खंडोबाचा हत्यार म्हणून ह्याला खांड बोलतात आणि " खांडोळी " करण हा शब्द ह्याच हत्यारा वरून आलाय
विविध पद्धतीच्या तलवारी बघायला मिळाल्या. 

राज्याभिषेकानंतर महाराजांची पालखी मिरवणूक सदरे पासून जगदीश्वराच्या मंदिरा पर्यंत निघते
शिवप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहत होता महिला, लहान थोर सगळी मंडळी मराठमोळ्या वेशभूषेत नाशिक ढोलाच्या तालात मिरवणुकीत सामील झाली होती. कोणी तलवार - दांडपट्ट्याचे मैदानी खेळ दाखवत होते कोणी लेझीम खेळत होते ,


नावूवारी साडी तलवार घेवून महिला अबला नसून सशक्त झाशीच्या राणी आहेत हे दाखवत होत्या. महाराजांच्या जल्लोषात सगळे तल्लीन झाले होते 



मिरवणूक आता बाजारपेठेतून होळीच्या माळातून  जाग्दिश्वरच्या मंदिराकडे निघाली आणि आम्ही जय शिवाजी जय भवानी बोलून पुढल्या वर्षी पुन्हा राज्याभिषेक सोहळ्याला हजार राहायचा ठरवून एक अविस्मरणीय अनुभव आनंद सोबत घेवून गडावरून परतीच्या प्रवासाला निघालो

शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।१।।
 
शिवरायांचे कैसें बोलणें ।
शिवरायांचे कैसें चालणें ।
शिवरायांची सलगी देणे ।
 कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग ।
म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग ।
कैसीं केली ।।३।।
याहुनी करावें विशेष ।

तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष ।
काय लिहावे ।।४।।
शिवरायांसी आठवावें ।
जीवित तृणवत् मानावें ।
इहलोकी परलोकीं उरावे ।
कीर्तीरूपें ।।५।।
निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु ।
श्रीमंत योगी ।।६।।
 
जय भवानी जय शिवाजी 
 
 
किशोर झेमसे
 

2 comments:

Alps Alive said...

Kz very nice and rich language used. Very nicely put. But again short and felt like reading more.

Your blog shows ur love for History. Keep it up and keep writing.

Unknown said...

जय हिंद
जय शिवराय