Tuesday, 1 July 2014

भेटी लागे जीवा २०१४

!!! भेटी लागे जीवा !!!



तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली !
वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली !!
गळाभेट घेण्या भिमेची निघाली तुझ्या नामघोषात इंद्रायणी !!

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली !
तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी  जीवाला तुझी आस का लागली ?
जरी बाप सार्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू  माउली !!
माउली माउली माउली माउली माउली माउली रूप तुझे !!!

नमस्कार माउली 

पंढरीचे लागले ध्यान रात्रंदिन, लाखो श्रद्धाळू भाविकांना पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली असते आणि दरवर्षी आषाढी एकादशी ला पंढरपुरी जाण्यासाठी वारकरी आळंदी वरून ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी बरोबर पायी चालत निघतात

वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यातील वारीला जात होते. पूर्वी प्रवासाची साधने फारशी नव्हती. त्यामुळे लहान लहान समूहाने लोक पंढरपूरला जात असत. 
जगाच्या इतिहासात इसवीसन १३ व्या शतका पासून आज पर्यंत अखंडित सुरु असणारी वारी हि एकमेव प्रथा असेल. वारी म्हणजे महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक अधिष्ठान . 
 
ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी असलेल्या हैबतराव बाबा आरफळकर यांनी या दिंड्यामध्ये सूसुत्रता आणली. ते ज्ञानेश्वराच्या पादुका पंढरपूरला घेऊन जात असत अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात, कथा करीत पंढरपूरला पायी जातात तेव्हा त्यांच्या समूहाला ‘दिंडी’ असे म्हणतात. 

 
तुकाराम महाराजही पंढरपूरची वारी करत असत. त्यांच्या चिरंजीवांनी नारायण महाराजांनी सन १६८५ साली श्रीतुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूराला घेऊन जाण्याची प्रथा सुरु केली. दिंडी सोहळ्याच्या या दोन परंपरा चालत आलेल्या आहेत.

ह्या वर्षी २० जून ला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी वरून निघाली आणि ८ जुलै ला माऊलींचा पंढरपूर ला आगमन होणार . दोन वर्षापूर्वी अतुल आणि मी पुणे ते सासवड असा वारी बरोबर प्रवास केला गतवर्षी सासवड ते जेजुरी ते वाल्हे  वारी सोबत मुक्काम झाला ह्या वर्षी पुढील टप्पा वारी बरोबर जाण्याचे ठरवले होते .
 
२८ आणि २९ जून शनिवार - रविवार वारीचा मुक्काम लोणंदला होता आणि लोणंद ते तरडगाव वारीचा प्रवास होता त्याच बरोबर रविवारी तरडगाव येथे सदाशिवनगरला उभं रिंगण पण होतं 
शनिवार २८ जून ला पुण्यातून निघून लोणंदला जायचं तिथे वारीसोबत मुक्काम करून रविवार वारी बरोबर तरडगाव पर्यंत पायी जायचं आणि उभे रिंगण पाहून पुन्हा परत यायचं असा आमचा बेत ठरला . वारीची तयारी झाली . रात्री वस्ती साठी लागणारा पोर्टेबल तंबू व्यवस्थित आहे कि नाही पहिला . 
 
लोणंद जेजुरी फलटण रस्त्यावरील एक गाव . ज्या ठिकाणी वारीचा मुक्काम असतो त्या मार्गावरील सर्व वाहतूक बंद असते तर  लोणंद च्या अलीकडे नीरा गाव आहे तेथे अतुल चे नातेवाईक राहतात त्यांचे कडे गाडी ठेवून पुढे लोणंदला जायचे ठरवले 

मागील वर्षी आम्ही सासवड जेजुरी ते वाल्हे असा प्रवास केला होता. वाल्हे येथून सासवड कडे परत येताना वाटेवर अतुल ने त्याचा हरिणे गाव दाखवलं होतं . ह्या वर्षी नीरा गावी जाताना हरीणे गाव लागणार होतं अतुलची  पत्नी नंदिनी त्याची मुले अर्णव आणि श्रावणी आणि आई वडील आमच्या बरोबर येणार होते त्यांना गावी सोडून  पुढे वारी करिता जाण्याचे ठरले 
 
शनिवार २८ जून सकाळी अतूल कडे पिंपरीला गेलो . अतुल आणि त्याची फॅमिली आम्ही सगळे हडपसर दिवाघाट मार्गे पालखी मार्गावरून निघालो . सासवड मधून बाहेर पडल्यावर जेजुरी कडे जाण्याच्या रस्त्याला हरीणे  - वाल्ह्या कडे जायचा रस्ता लागतो . रस्ता निमुळता आहे पण सुस्थितीत आहे. अतुलनेच सांगितलं वाटेल सथनिक आमदाराचे गाव आहे म्हणून रस्ता चांगला आहे :-)
दुपारी हरिणे गावी पोचलो .  गावात शिरतानाच एक मोठा वडाच्या झाडाचा पार लागतो  जुन्या मराठी चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या  गावातल्या   चावडी किंवा पारा सारखा अगदी तसाच मला वाटला,  मला फोटो काढायचा होता पण राहून गेलं . अतुल च्या घरी पोचलो त्याच्या काकूने जेवण बनवून ठेवलाच होत . बाजरीची भाकरी, चवळीची आमटी भात मस्त जेवलो आणि लगेचच अतुल आणि मी वाल्ह्या वरून नीरेकडे निघालो . रामायणाची रचना करणारे समर्थ वाल्मिकींचे हेच ते वाल्हे गाव  

पालखी मार्गावर नीरा गावाचे पण महत्व आहे . वाल्हे कडून लोणंद कडे जाताना माऊलींची पालखी नीरा गावी विसावा घेते आणि श्री ज्ञानदेव दत्त घाटात नीरा नदीत स्नान करून सातारा जिल्यात लोणंदकडे प्रवेश करतात . इंद्रायणी आणि चंद्रभागा ह्या नद्यान व्यतिरिक्त फक्त नीरा नदीतच माऊलींचे स्नान होते. माऊलींच्या ह्या स्नानाने जणू नीरा नदीनच पावन होते 

दुपारी तीन वाजता अतुलच्या नातेवाईकांच्या घरी गाडी पार्क केली आणि आम्ही लोणंद कडे निघालो . लोणंदला पालखीचा मुक्काम असल्यामुळे मुख्य वाहतूक बंद होती आम्हाला सिक्ससीटर मिळाली ,  बोलायला नुसती सिक्ससीटर  लोणंदला जायला दुसरी काही वाहन नसल्यामुळे माऊलींच्या दर्शनाला लोणंदला जाणारे बरेच प्रवासी होते.  ह्या सिक्ससीटर मध्ये मी मोजले २० प्रवासी भरले होते … भरले काय कोंबले होते :-)

वाल्ह्या वरून लोणंद ला आल्यावर माऊलींचा पूर्ण दिवस मुक्काम लोणंद ला असतो 

१५-२० मिनिट मध्ये लोणंदला पोचलो , गावात जाण्याचा रस्ता वाहनांसाठी बंद होता,  थोडा आधी उतरून चालत लोणंदला आलो . आम्हाला आमच्या नेहमीच्या दिंडी क्रमांक ५५ च्या ठिकाणी जायचं होतं . माझा मित्र दत्ता त्याचे बाबा दरवर्षी वारीला येतात ते ह्या दिंडी मध्ये आहेत त्यांना फोन केला आणि दिंडीचा मुक्काम कुठे आहे विचारलं . आधी माऊलींचा लोणंद मध्ये मुक्काम आहे तिथे जावून आलो . दर्शनाला खूप मोठी रांग होती . नंतर माऊलींच्या रथाबरोबरच प्रवास करणार होतो म्हणून दर्शनासाठी रांगेत उभे न राहता आमच्या दिंडीचा मुक्काम शोधायला निघालो . शेकडो दिंड्या आणि लाखो भाविक , नवीन जागा . दत्ताच्या बाबांनी जी जागा सांगितली तिथे ते दिसतच नव्हते . शेवटी एक तास फिरून आमची भेट झाली . ते दिंडी क्रमांक ५५ च्या मुक्कामाच्या जागी घेवून गेले 
 
दोन वर्ष ह्या दिंडी बरोबर वारी मध्ये येत आहोत त्यामुळे बऱ्याच जणांशी ओळख झाली आहे . ह्यावर्षी पेण आणि अलिबाग भागातील ५०-६० वारकरी दिंडी मध्ये सहभागी झाले आहेत . सगळ्यांची भेट घेतली त्यांना पण दोन दिवस का होईना आम्ही वारी मध्ये सहभागी होतो ह्याचा आनंद होतो . आज मुक्कामाचा दिवस त्यामुळे सर्वांनी आराम केला होता संध्याकाळी नाश्त्याला बटाटेवडे बनवले होते आम्ही गेल्यागेल्या गरमागरम बटाटेवडे दिले . चवीला खूपच छान होते वडे आमच्या पेण च्या हरीच्या बटाटेवड्याची आठवण झाली :-)

दिंडीच्या ट्रक मध्ये आमचं सामान ठेवलं,  थोडं आराम करून आम्ही इतर दिंड्या बघायला बाहेर पडलो 
आता ऊन थोडी मावळतीला लागली  होती . सर्व दिंड्या मध्ये भजन , कीर्तन भारुड आणि काही खेळ सुरु होते . ते बघत आणि दिंडी मधील लोकांचे अनुभव ऐकत फोटोग्राफी सुरूच होती . पालखीचा मुक्काम असल्यामुळे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भाविक माऊलींच्या दर्शनासाठी लोणंदला येत होते त्यामुळे आज लोणंद मध्ये जत्रा भरल्याच रूप आल होते . खेळणी , मिठाई इतर साहित्य असे बरेच स्टोल्स लागले होते. 

रात्री ७-७:३० वाजता पुन्हा दिंडीच्या मुक्कामी आलो . आमचा टेंट बसवला . ह्या तंबूचा वारीतील लोकांना बराच अप्रूप वाटत.  बरेच जण हा काय प्रकार आहे बघायला येतात माहिती विचारतात स्वतः बद्दल सांगतात ह्या तंबू मुळे दोन वर्षात खूप साऱ्या वारकर्यांशी गप्पा मारता आल्या वारी बद्दल नवनवीन माहिती विचारता आली लोकांचे अनुभव ऐकायला मिळाले
 
एक २७-२८ वर्षाचा तरुण मुलगा तंबू बघून विचारायला आला तो सांगत होता त्याची आई गेली २२ वर्ष वारीला यायची पण नंतर वयोमानामुळे त्यांना येणं शक्य होत नव्हता तर आता हा मुलगा नेमाने वारीला यायला लागला , खूप चांगला पखवाज वाजक आहे त्यामुळे दरवर्षी कोणत्या नी कोणत्या दिंडीत सहभागी होतो . तोच सांगत होता मागील वर्षी  त्याच्या पायाला खूप लागलं होतं नीट चालू शकत नव्हता पण त्यास्थितीत पण त्याने वारी पूर्ण केली . एक वाक्य बोलून गेला तो आणि माझ्या मते सर्व वारकर्यांच्या मनातला बोलला … कधी त्रास होतो काही प्रोब्लेम्स येतात पण ती ज्ञानोबा माऊली काळजी घेते.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा मध्ये अगदी फिक्कट रेषा आहे देव आपल्याला काही देईल आणि त्यासाठी काही करावा हि झाली अंधश्रद्धा पण आपण काहीही न मागता ती माऊली आपली काळजी करते हा विश्वास वाटणं हि आहे वारकर्यांची निस्सीम भक्ती आणि अपार श्रद्धा  

थोड्याफार गप्पा झाल्या ९ वाजले आज वारकर्यांन बरोबरच गरमागरम वरण भात चवळीची भाजी सोबत पापड चटणी आणि आग्रहाचं वाढणं पोटभर जेवलो . दिंडी बरोबर लाईट ची थोडीफार सोय असते पण ती पुरेशी नसते . एक वारकरी म्हणाले आमच्या साठी नवीन तंत्रज्ञानाने लाईट ची काही सोय करता येईल का ? अतुल आणि मी विचार करू लागलो खरंच असा काही करता येईल का solar power वर चालणार काही स्वस्तात बनेल असा काही उपकरण ज्याचा वारकरी रात्री उपयोग करू शकतील .  हा Blog  वाचणाऱ्याला काही अशी कल्पना सुचली तर अतुल आणि मला नक्की सपर्क करा 

आता जवळपास सर्वच दिंड्यांमधील जेवणं आटोपली होती आणि सगळी कडून भजन कीर्तनाचे आवाज येत होते . पूर्ण भक्तिमय आसमंत . आमच्या दिंडी मध्ये पण ह . भ . प . (हरी भक्त परायण ) श्री माधव महाराज , परभणी यांचं कीर्तन होते  .त्यांनी  तुकाराम महाराजांचे अभंग अगदी सोप्या शब्दात वेगवेगळ्या कथा सांगून तुकारामांनी सांगितलेल्या नामस्मरणाचे महत्व सांगितलं, सर्वसामान्य वारकऱ्याला समजेल अश्या शब्दात प्रबोधन केले

 

रात्री चे ११:३० झाले होते आता सर्व मंडळी झोपायला त्यांच्या तंबू मध्ये गेली . आम्ही पण आमच्या तंबू मध्ये येवून झोपून गेलो 

रविवार दि २९ जुन - पहाटे  ५:०० - लवकरच जाग आली . पहाटेचे भजन आणि अभंग सुरु झाले होते . मागील वर्षीच्या Blog  मध्ये मी दिंडीतील तंबू , राहण्याची व्यवस्था ह्या बद्दल थोडंफार लिहिल होता तर आता त्या बद्दल पुन्हा लिहित नाही 

हि ५५ क्रमांक् ची दिंडी आळंदी चे श्री प्रेमानंद महाराज काढतात, सकाळी त्याचं दर्शन घेतलं . माऊलींची पालखी दुपारी लोणंद वरून तरडगाव कडे निघते त्यामुळे वारकरी लोणंद मधेच दुपारचं जेवण घेऊन निघतात. 
 
आम्ही आता दिंडी वरून निघून माऊलींच्या मुख्य पालखी तळावर आलो . आजहि दर्शनासाठी बरीच रांग होती . पालखी समोरच्या पटांगणात छान कीर्तन सुरु होतं , बाजूलाच माऊलींच्या पालखीचा रथ सजवला होता . त्या बाजूला माऊलींचे अश्व उभे होते . पालखीचं दर्शन घेवून येणारे भाविक पुढे माऊलींच्या रथाला आणि अश्वांना नमस्कार करून जात होती .  इथेच आम्हाला एक नवीन मित्र मिळाला विनायक साठे हा सकाळीच पुण्याहून पालखी सोहळा बघायला बस ने आला होता . 

वारी मध्ये कोणीच लहान थोर नाही सगळ्यांच एकच नाव "माऊली" सगळे एकमेकांना नमस्कार करतात . मी कॅमेरा घेवून काही फोटो काढत होतो .  एक खूप वयस्कर आजोबा दिसले त्यांचा फोटो काढला नमस्कार माऊली बोलून त्यांच्या पाया पडलो तर ते पण माझ्या पाया पडले . वारी मध्ये वय  गरीब-श्रीमंत, जात-पात असे काहीच भेद नाहीत सर्व समान सर्वान  मध्ये त्या पांडुरंगाचा वास आहे हि भावना आहे . साधा १००-२०० चा जमाव एकत्र आला तरी वादविवाद गोंधळ निर्माण होतं इथे वारी मध्ये ४-५ लाख वारकरी असूनही सगळं सुरळीत चालत . समानता आणि बंधुभाव हीच त्या मागची प्रेरणा आहे .  समानता आणि बंधुभाव हे नुसते विचार नसून त्याचा जर अनुभव घायचा असेल तर एकदा तरी वारीला नक्की जायला हवं 

माऊलींची पालखी निघायला अजून थोडा वेळ होता आम्ही तिघांनी थोडा नाश्ता करून एका झाडाच्या सावलीत विश्रांती घेतली 
 
दुपारी १ वाजता - माऊलीची पालखी लोणंद वरून तरडगाव कडे निघाली . लोणंद ते तरडगाव जवळपास ८-१० किमी चा पल्ला . आम्ही आता थोडा वेळ माउलींच्या रथासोबत चालून दिंडी क्रमांक ५५ मध्ये जावून मिळालो 
जसं आधी सांगितल्या प्रमाणे प्रत्येक दिंडी चा एक क्रमांक असतो आणि रथा मागे किंवा रथापुढे आपल्या क्रमांका नुसार दिंडी चालत असते 
माऊलींच्या पादुका 
माऊलींचा रथ 

ह्या वर्षी पाऊसाला अजून सुरुवात नाही . रणरणत्या उन्हात वारीसोबत आम्ही चालत होतो . भजन कीर्तन आणि हरिनामाच्या गजरात चालताना त्रास जाणवत नाही . प्रत्येक दिंडीचा क्रमांकाचा बोर्ड घेवून एक वारकरी सगळ्यात पुढे असतो (अतुल ने थोडा वेळ आमच्या दिंडी चा बोर्ड धरला होता ) त्याच्या बाजूला भागवत धर्माची पताका भगवा झेंडा घेवून झेंडाकरी असतात . त्यांच्या मागे पखवाज वाजवणारा आणि टाळकरी त्यांच्या मागे दिंडीच्या माधोभागी वीणा घेऊन दिंडीचे महाराज असतात त्यांच्या सोबत तुळशी घेवून एक स्त्री असते मागे पाणी घेवून हंडाकरी असते आणि त्यामागे बाकी वारकरी स्त्रिया भजन कीर्तन करीत असतात 




तरडगाव थोडं जवळ आल्यावर आम्ही दिंडी सोडून पुढे रिंगण होणार आहे त्या जागी पुढे निघून आलो . उभे रिंगण बघायला बरीच गर्दी जमा झाली होती .  मोक्याच्या जागांवर सर्व Media च्या vans आधीच उभ्या होत्या 
आम्ही पण रिंगण बघायला मिळेल ह्या आशेन दूरवर एका ट्रक च्या छतावर चढलो . माझ्या कडे SLR असल्याचा एक फायदा होता बऱ्याच जणांना आम्ही News Media किंवा News Paper चे वार्ताहर वाटायचो आणि कुठेही जायला मिळायचं 




दोन प्रकारचे रिंगण होतात उभे रिंगण आणि गोल रिंगण . तरडगाव ला उभे रिंगण असते पुढे वाक्री ला गोल रिंगण असते ते खूप मोठं असतं . रिंगण चं महत्व काय आहे किंवा ती प्रथा काय आहे हे काही जेष्ठ वारकर्यांकडून जाणून घायचा प्रयत्न केला पण विशेष अशी काही माहिती नाही मिळाली . वारकर्यांना विरंगुळा म्हणून एक खेळ म्हणून हि प्रथा सुरू झाली असावी . 
उभे रिंगण मध्ये सरळ रस्त्यावर पुढे चोपदार आणि त्याचा घोडा आणि मागे माऊलींचा एकटा घोडा भरधाव धावत सुटतात आणि माऊलींचा घोडा चोपदाराच्या घोड्याला मागे टाकून पुढे निघून जातो आणि माऊलींच्या पालखी जवळ जाऊन माऊलींना प्रणाम करतो 
हातात भगव्या पताका, टाळृ-मृदुंगाचा गजर आणि वारकऱ्यांच्या ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने सारा रिंगण परिसर दुमदुमून गेला रिंगण सोहळा संपन्न होताच आश्वाच्या पायाखालची माती आपल्या भाळी लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली व या भक्तीमय क्षणी हरीनामाचा गजर केला. 

रिंगण सोहळा संपन्न झाल्यावर आता आम्ही इथूनच तरडगाव वरून विठूरायाला वंदन करतो आणि महाराष्ट्रावरील दुष्काळाच सावट जाऊन लवकरच पाऊसाला सुरुवात होउदे अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना करून परतीच्या मार्गाला लागतो 

पालखी मार्गावर वाहतूक पूर्ण थांबवली असते त्यामुळे आम्हाला तरडगाव वरून लोणंद कडे परत येण्यासाठी कोणताच वाहन मिळालं नाही . पुन्हा परतीचा पायी प्रवास आता मात्र पाय भयंकर दुखायला लागले होते . हळू हळू करत पुन्हा लोणंदला आलो . लोणंद वरून एक वडाप मधून नीरे ला आलो. नीरे मध्ये अतुल च्या नातेवाईकांकडे चहा घेतला थोडी तरतरी आली आणि पुन्हा हरणी कडे जायला निघालो . अतुलच्या फॅमिली घेवून लगेच पुण्याकडे निघायचं होतं
 
रात्री ७:३० च्या सुमारास अतुलच्या गावी पोचलो . वारीवरून आलो म्हणून अतुल च्या आईने पाय धुतले निरांजनाने ओवाळले . प्रत्येक भाविकाची धारणा आहे कि वारी मध्ये प्रत्यक्ष पांडुरंग वावरत असतो आणि वारी करून येतो त्याला पांडुरंगाचा सहवास प्राप्त झालेला असतो आम्ही लहान असून अतुल चे आई बाबा काकू  आमच्या पाया पडले आम्ही त्यंच्या पाया पडलो . वारी हि महाराष्ट्राची संस्कृती आहे परंपरा आहे.
 
अतुल च्या घरी थोडा विसावा घेवून आता आम्ही पुण्याकडे निघालो . रात्रीचे ८:०० वाजले होते गावाकडील छोटा रस्ता, शांत काळोख आणि समोरच आकाशात नुकताच उमललेली प्रतिपदेची सुंदर चंद्रकोर अगदी श्री महादेवाच्या मस्तकावरील भासत होती 

काल येताना मी अगदी गाडी जोरात पळवत आणली होती आज रात्री जाताना अगदी सावकाश जायचं नंदिनी ने सांगितलं होतं :-)

रात्री ११:३० वाजता पुन्हा एक वारीचा नवीन सुखद अनुभव घेवून पुण्याला घरी आलो 
 

पुंडलिका वरदे हरी विठ्ठल

श्री ज्ञानदेव तुकाराम

 पंढरीनाथ महाराज कि जय




वारी मधील आणखी काही फोटो :

https://picasaweb.google.com/106156735915030488638/Wari2014?authkey=Gv1sRgCOmk_4mP7I3A-QE&noredirect=1

http://youtu.be/G74tzX2L_QM


किशोर केशव झेमसे (zemasekk@gmail.com)
अतुल यादव (atul.yad@gmail.com)

Friday, 13 June 2014

शिवराज्याभिषेक सोहळा

३४१ वा शिवराज्याभिषेक सोहळा 




 
निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥

परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी ।
तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥

यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥

इसवी सन १२९४ - रामदेवराव यादव देवगिरी वरून राज्य करीत होते, महाराष्ट्रावर वर्षातील बाराही पोर्णिमा सुखाचे चांदणे शिंपीत होत्या पण ह्या सुखाला नजर लागली होती एका सैतानी पठाणाची "अर्जे मामालिक अल्लाउद्दिन खलजी" . एक महाभयंकर कर्दनकाळ . ह्या अल्लाउद्दिन खलजी ने यादवांच्या देवगिरीवर आक्रमण केले. मराठ्यांचे प्रचंड पराभव झाला उरल्यासुरालेल्यांची कत्तल करून खिलजी अमाप संपत्ती लुटून गेला आणि महाराष्ट्रवर परकीयांचे असुरी कालचक्र सुरु झाले

इसवी सन १६३० ह्या गुलामगिरी ने पिचलेल्या महाराष्ट्रात भोसले घराण्यात तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला आणि जेष्ठ शु त्रयोदशी शके १५९६ म्हणजेच  दिनाक ६ जून १६७४ रोजी शिवराज्याभिषेक झाला, शिवाजी महाराज छत्रपती झाले ३५० वर्षाची काळरात्र संपून महाराष्ट्र स्वतंत्र झाला स्वराज्य आलं सुराज्य आलं

दरवर्षी ६ जून आणि तिथी प्रमाणे जेष्ठ शु त्रयोदशीला रायगडावर हा  शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो . बऱ्याच वर्षांची इच्छा होती एकदा रायगडावर जावून शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी व्हावे
ह्या वर्षी ११ जून ला तिथी प्रमाणे हा सोहळा रायगडावर होणार होता. इतिहास संशोधक, शिवाई हाईकर्स आणि दुर्गराज रायगड शिवराज्याभिषेक  समितीचे सदस्य श्री संतोष चंदने  ह्यांना विचारले राज्याभिषेक सोहळ्याला जाणार आहात का त्यांनी त्यांच्या सोबत यायला सांगितलं आणि १० जून ला रायगड जाण्याचं ठरलं. संतोष बरोबर त्यांचे काही सहकारी होते
१० जून ला सकाळी ७:३० वाजता आम्ही ७ जण रायगड जाण्यासाठी पुण्यातून निघालो. ताम्हणी घाट - निजामपूर - माणगाव मार्गे ११:३० वाजता पाचाड ला पोचलो . तेथे देशमुख खाणावळी मध्ये जेवण करून दुपारी १२:३० वाजता किल्ले रायगड चढायला सुरुवात केली
रायगडला जवळपास १८०० पायऱ्या आहे चित दरवाजा  आणि नंतर मुख्य हत्ती दरवाज्या मार्गे किल्ला वर जाण्याचा मार्ग आहे . आम्ही मुख्य मार्गावरून न जाता नाना दरवाज्यातून पायवाटेने किल्ला चढायला सुरुवात केली .

नाना दरवाजा 

त्याकाळी शिवराज्याभिषेक सोहळ्याला इंग्रजांचा प्रतिनिधी हेन्री आक्झींडेन ह्याच नाना दरवाज्यातून रायगडावर गेला होता.
भर दुपारी रणरणत्या उन्हात गड चढायला सुरुवात केली होती तप्त उन्हाने अंगाची लाहीलाही होत होती जिथे सावली मिळेल तिथे विसावा घेत मार्गक्रमण सुरु होतं, मुख्य रस्ताने न आल्यामुळे एक बर झाला निम्म्या पायऱ्या लागल्या नाहीत आणि हा थोडा जवळचा मार्ग होता
पुढे जावून मशीद मोर्चा लागला इथेच मदारी मेहतर ची समाधी आहे .

मदारी मेहतर समाधी 

हाच मदारी मेहतर महाराजांबरोबर आग्र्याच्या नजर कैदेत होता. इथे थोडा विसावा घेवून आम्ही मुख्य दरवाज्या जवळ मुख्य रस्त्याला आलो

रायगड चा हा गोमुखी मुख्य दरवाजा स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. अगदी जवळ जाई पर्यंत दरवाज्या दिसत नाही त्यामुळे शत्रूला दरवाज्यावर सरळ मारा करता येत नाही त्याच प्रमाणे वक्राकार भिंती मुळे हातघाई च्या लढाई ला जास्त शत्रू सैन्याला दरवाज्य जवळ येता येत नाही त्याच प्रमाणे दरवाजा धडक मारून पाडणं पण कठीण होतं



प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस गोब्राह्मण प्रतिपालक हिंदूपतपादशहा  सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज. श्रीमंतयोगी छत्रपती श्री.शिवाजी महाराज कि जय

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय असा जयजयकार करून मुख्य दरवाज्यातून आत आलो.

 

 

रायगडची भव्य तटबंदी टकमक टोक ह्याच विहंग दर्शन होत. महाराजांनी रायगड इतका मजबूत गड बांधला होता कि शत्रूला युद्धात हा गड कधीच जिंकता नसता आला. संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर सूर्याजी पिसाळ ने फितुरी करून शत्रूला गडाचे दरवाजे उघडून दिले म्हणून हा किल्ला मुघलांच्या ताब्यात आला

गड चढताना मध्ये बऱ्याच ठिकाणी लिंबू सरबत ताक मिळतं . उन्हात निथळून गेलो होतो लिंबू सरबत घेवून थोडी तरतरी आलो . बरोबर तीन तास चालल्यावर ३:३० वाजता आम्ही गडावर पोचलो. पहिलेच लागतो तो हत्ती तलाव त्याच्याच बाजूला रायगड जिल्हापरिषद चं गेस्ट हाउस आहे . दोन दिवस सर्व शिवभक्तांसाठी इथे जिल्हा परिषदे वतीने मोफत जेवणाची सोय केलेली असते. गडावर काही धनगरांची थोडी झोपडीवजा घरं अश्याच एका झोपडीत आम्ही राहायची सोय केली तिथे जावून सामान ठेवलं आणि थोडा वेळ आराम केला

ह्याच दरम्यान गाड्वर शिक्राई देवी आणि जगदीश्वर मंदिर मध्ये पूजा सुरु होती

थोडावेळ आराम करून मुख्य सदरेवर आलो. इथे महारजांच्या मूर्ती ची तुला होणार होती. मिठाई, फळे, सुकामेवा, पुस्तके अश्या वस्तूंनी महाराजांची तुला करण्यात आली. आम्ही पण खाडी साखर आणि शेंगदाणे ह्याने महाराजांची तुला केली नंतर तुले मधले सगळे जिन्नस प्रसाद म्हणून गडावर सगळ्या शिवभक्तांना वाटला जातो.

 

तुला झाल्यावर काही ग्रुप्स ने मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. ते पाहिल्यावर आम्ही गड पहायला निघालो आधी टकमक टोकावर गेलो. टकमक टोक म्हणजे एक प्रचंड सुळका आहे खाली भयंकर दरी, मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचा इथून कडेलोट करण्यात येत असे

टकमक टोक


टकमक टोकावरून नंतर आम्ही जगदीश्वराच्या मंदिरात गेलो. तिथेच बाजूला महाराजांची समाधी आहे आणि महाराज्यांच्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा

हिरोजी इंदुलकरांनी  फक्त ६ वर्षात असा अभेद्य गड बांधला महाराजांनी खुश होऊन हिरोजींना काय बक्षीस देवू विचारलं तेंव्हा हिरोजींनी काहीही न मागता अशीच सेवा करण्यास मिळावी अस सांगितले
जगदीश्वराच्या पायरी वर "सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुरकर" असा कोरलेलं दिसतं

 


गड पाहून पुन्हा झोपडीवर आलो थोडा वेळ आराम केला . रात्रीचं जेवण झालं गरमागरम तांदळाची भाकरी आणि पिठलं. जेवून पुन्हा सदरेवर आलो पोवाडा, देवीचा गोंधळ असे कार्यक्रम सुरु होते . आता बरेच शिवभक्त गडावर आले होते . पाऊस बिलकुल नव्हता त्यामुळे सर्वांनी बाजारपेठ आणि होळीच्या माळावर तंबू टाकून राहायची सोय केली होती

आम्ही सुद्धा आमच्या झोपडीत परत आलो , थंडगार सोसाट्याचा वारा सुटला होता. रमेश ठोंबरेनी एका कवितेत चंद्रमोळी असा उल्लेख केलाय अशाच चंद्रमोळी मध्ये पिठूर चांदण्यात झोपी गेलो. रात्र होई पर्यंत सदरे वरून कार्यक्रमाचे आवाज येत होते . पहाटे ४:०० वाजता जय भवानी जय शिवाजी अशा शिवप्रेमी च्या जयजयकारात जाग आली . बरेच शिवभक्त रात्री निघतात आणि पहाटे २-३ वाजता गड चढायला सुरुवात करतात आणि सकाळी ५-६ पर्यंत राज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्य साठी गडावर पोचतात

आम्ही पण ५ वाजता उठून झब्बा फेटा असा मराठमोळा पेहराव करून सदरेवर पोचलो. ह्या वर्षीचा अभिषेक आमचे बदलापूरचे मित्र अजिंक्य हाईकर्स आणि कोकणकड्याचे सदस्य श्री   सुनील कदम ह्यांच्या हस्ते होणार होता . पवित्र मंत्रघोषात दुध दही लोणी आणि पवित्र नद्यांच्या पाण्याने महाराजांचा अभिषेक झाला शिवाजी महाराज कि जय अश्या शिवभक्तांच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता .

शिवराज्याभिषेक 


ह्या सोहळ्याला रायगड जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष, महाड चे आमदार श्री भारत गोगावले, भिवंडी चे आमदार श्री रुपेश म्हात्रे आणि ठाण्याचे महापौर श्री हरिश्चंद्र ठाकूर आवर्जून उपस्थित होते. अमाप जनसमुदाय हा सोहळा बघण्यासाठी लोटला होता.

बऱ्याच शिवप्रेमिंकडे पारंपारिक हत्यारं होती कोणी तलवार कोणी भाला कानी दांडपट्टा घेवून आले होते . आमच्या कडे पण एक खांड होती खांड म्हणजे तलवारी सारखच हत्यार ह्याची पात अगदी सरळ असते, खंडोबाचा हत्यार म्हणून ह्याला खांड बोलतात आणि " खांडोळी " करण हा शब्द ह्याच हत्यारा वरून आलाय
विविध पद्धतीच्या तलवारी बघायला मिळाल्या. 

राज्याभिषेकानंतर महाराजांची पालखी मिरवणूक सदरे पासून जगदीश्वराच्या मंदिरा पर्यंत निघते
शिवप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहत होता महिला, लहान थोर सगळी मंडळी मराठमोळ्या वेशभूषेत नाशिक ढोलाच्या तालात मिरवणुकीत सामील झाली होती. कोणी तलवार - दांडपट्ट्याचे मैदानी खेळ दाखवत होते कोणी लेझीम खेळत होते ,


नावूवारी साडी तलवार घेवून महिला अबला नसून सशक्त झाशीच्या राणी आहेत हे दाखवत होत्या. महाराजांच्या जल्लोषात सगळे तल्लीन झाले होते 



मिरवणूक आता बाजारपेठेतून होळीच्या माळातून  जाग्दिश्वरच्या मंदिराकडे निघाली आणि आम्ही जय शिवाजी जय भवानी बोलून पुढल्या वर्षी पुन्हा राज्याभिषेक सोहळ्याला हजार राहायचा ठरवून एक अविस्मरणीय अनुभव आनंद सोबत घेवून गडावरून परतीच्या प्रवासाला निघालो

शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।१।।
 
शिवरायांचे कैसें बोलणें ।
शिवरायांचे कैसें चालणें ।
शिवरायांची सलगी देणे ।
 कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग ।
म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग ।
कैसीं केली ।।३।।
याहुनी करावें विशेष ।

तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष ।
काय लिहावे ।।४।।
शिवरायांसी आठवावें ।
जीवित तृणवत् मानावें ।
इहलोकी परलोकीं उरावे ।
कीर्तीरूपें ।।५।।
निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु ।
श्रीमंत योगी ।।६।।
 
जय भवानी जय शिवाजी 
 
 
किशोर झेमसे
 

Wednesday, 25 December 2013

अष्टविनायक दर्शन - २०१३

वक्रतुंड महाकाय सर्वकोटी समप्रभ: ।
निर्विघ्नं कुरुमेदेव सर्वकार्येषु सर्वदा  ।।

       बरेच दिवस अष्टविनायक ला drive करून जायची इच्छा होती , whatsapp ग्रुप chat वर जेजुरी चा विषय निघाला होता आणि सहजच बोलून गेलो अष्टविनायक करायचं आहे आणि सगळेच तयार झाले . आणि मग आमचं नेहमीचं trip planning . डिसेंबर मध्ये जवळपास सगळ्यांच्या सुट्ट्या होत्या तर मग २०, २१ आणि २२ डिसेंबर ला अष्टविनायक करायचं ठरवलं .जसे जसे दिवस जवळ आले तसं late night whatsapp वर गप्पांचा फड जमू लागला दररोज नवीन planning .  तीन दिवसात जेजुरी आणि अष्टविनायक पूर्ण करायचं . base location असणार वाकड पुणे 
तीन दिवसाचा एक travel plan बनवला आणि plan proper follow करायचं ठरवलं 
 
दिवस १ ला (जेजुरी - मोरगाव - सिद्धटेक - रांजणगाव - थेऊर )

पहाटे     ५:०० - वाकड वरून जेजुरी कडे निघायचं
सकाळी ७:०० - जेजुरी ला खंडोबाचे दर्शन नंतर breakfast
सकाळी ९:०० - जेजुरी वरून मोरगाव (२० किमी )
सकाळी ११:०० - मोरगाव दर्शन करून सिद्धटेक कडे (७० किमी )
दुपारी   १:०० - सिद्धटेक दर्शन आणि दुपारचे जेवण
दुपारी   ३:०० - सिद्धटेक वरून रांजणगाव कडे (८० किमी )
दुपारी  ४:३० - रांजणगाव दर्शन
संध्याकाळी ६:३० - रांजणगाव वरून थेऊर कडे (६५ किमी )
रात्री ८:३० - रांजणगाव दर्शन घेवून वाकड कडे

पहिला दिवस थोडा घाईगडबडीचा वाटत आहे पण पर्याय नाही पहाटे न चुकता ५ ला निघावच लागणार

दिवस  २ रा (लेण्याद्री - ओझर - शिवनेरी )

सकाळी  ६:३० - वाकड वरून लेण्याद्री कडे (११० किमी )
सकाळी  ९:३० - लेण्याद्री गणपती दर्शन
सकाळी ११:३० - लेण्याद्री वरून ओझर कडे (१५ किमी )
दुपारी   १:३० - ओझर विघ्नहर दर्शन करून दुपारचे जेवण घेवून शिवनेरी कडे (१५ किमी )
संध्याकाळी ५:३० - शिवनेरी वरून वाकड कडे

दिवस ३ रा - (महड - पाली - पेण )

सकाळी ८:०० - वाकड वरून महड कडे निघायचं
सकाळी ११:०० - महड वरदविनायकाचे दर्शन घेवून पाली कडे (३५ किमी )
दुपारी १:३० - बल्लाळेश्वर दर्शन घेऊन पेण
दुपारी ३:३० - पेण कडून मुंबई कडे प्रयाण

अष्टविनायक यात्रे च planning  तर final झाल होत आता सगळे १९ तारखेची वाट बघत आहेत . 
 
अल्पना , रीना, चंद्रशेखर , पराग आणि मी असे आम्ही ५ जण पहिल्या दिवशी निघणार , किरण आणि प्रसाद शनिवार आणि रविवारी  बरोबर असणार. अल्पनाची RITZ आणि चंद्रशेखर ची I10 ने प्रवास करायचा आहे 
 
गुरुवार, १९ डिसेंबर - पराग, रीना आणि चंद्रशेखर अल्पनाच्या घरी गोवंडी ला आले आणि तिथून वाकड ला माझ्या घरी यायला निघाले . 
 
१९, डिसेंबर - रात्री ९:०० वाजता The HewittKatta gang माझ्या घरी आले . मी जेवणाची थोडी तयारी करून ठेवली होती . रीना मस्त वांग्याचे भरीत करणार होती . आल्या आल्या रीना आणि अल्पना किचन मध्ये गेल्या आणि मस्त भरीत बनवलं (ह्या वांग्याच्या भरीत च्या recipe चा एक वेगळा ब्लोग लिहायला हवा )
छान जेवण झालं सोसायटी मध्ये एक walk घेऊन आलो गप्पा टप्पा झाल्या आणि १२:३० च्या आसपास सकाळी ५ ला निघायचं आहे असं ठरवून  झोपून गेलो
 
पहिला दिवस - २० डिसेंबर 
 
पहाटे ३:३० - लवकरच जाग आली , रीना आणि अल्पना पण उठल्या होत्या . सगळ्यांचं आवरून झालं आणि आमची अष्टविनायक यात्रा सुरु झाली . 
 
पहाटे ५:१५ - वाकड वरून आम्ही जेजुरी कडे निघालो . जेजुरी कडे हडपसर - दिवाघाट - सासवड  ह्या पालखी मार्गावरून जाता येत पण मला कात्रज - बोपदेव घाटातून सासवड कडे जायला आवडतं रोड पण चांगला आहे आणि ह्या रस्त्यावर जास्त वर्दळ नसते 
सगळे जण थंडी ची जोरात तयारी करून आले होते .  दोन तीन दिवस आधी पुण्यात सकाळी ७-८ डी तापमान असायचं पण आज विशेष अशी थंडी जाणवत नाही आहे . बोपदेव घाटातून सासवड ला आलो आणि जेजुरी कडे निघालो ह्या मार्गावर रस्ता रुंदीकरण सुरु आहे आणि ५ - ६ किमी चा टप्पा खूपच खराब झाला आहे 
 
सकाळी ६:४५ - जेजुरी ला पोचलो गाडी पार्क केली एकदम लवकर आलो होतो अजून मंदिरा जवळची दुकाने पण उघडली नाहीत 
सकाळ च्या गारव्यात २०-२५ मिनिटात जेजुरी गड चढून देवळात आलो दर्शनाला अजिबात गर्दी नव्हती खंडोबाचं एकदम छान दर्शन झालं . जेजुरी गडाचा परिसर  सगळी कडे भंडाऱ्या मुळे पिवळ्या धम्मक सोनेरी रंगाने उजळून गेल्या सारखा दिसतो 


 
सकाळी ८:०० - जेजुरी वरून आम्ही आता मोरगाव कडे निघालो . अष्टविनायक पहिला गणपती 
जेजुरी वरून बारामती कडे जाणाऱ्या रस्तावर २० किमी वर मोरगाव आहे . रस्ता एकदम छान आहे आणि असणारच ना पवार साहेबांच्या गावी जाणारा हा रस्ता :)
 
सकाळी ८:३०
मोरगाव च्या मयुरेश्वर गणपती चे खूपच छान दर्शन झाले
(मयुरेश्वर - मोरगाव )
 
मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची ‍संरक्षण भिंत आहे. गाभार्‍यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.
 
असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात.
या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ‍ती सिंधुसुराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली
 
 
सकाळी ९:३० - मोरगाव ला breakfast करून आम्ही सिद्धटेक कडे निघालो 
मोरगाव ते सिद्धटेक जवळपास ७० किमी चा अंतर आहे . मोरगाव बारामती रोड वरून शिरूर सातारा रोड वर डावीकडे वळायच तिथून कडेगाव पर्यंत जावून तिथे पुणे सोलापूर रोड वर उजवी कडे वळायच पुढे पाटस पर्यंत जावून टोळ नाक्याच्या अलीकडे दौंड रोड वर डावी कडे वळायच . दौंड गावातून पुढे सिद्धटेक कडे आलो 
 
सकाळी ११:०० वाजता - सिद्धटेक च्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले इथे पण दर्शन साठी अजिबात गर्दी नव्हती एकदम छान दर्शन झालं . सुरुवात तर खूपच छान झाली होती आम्ही आमच्या plan पेक्षा दोन तास पुढे आहोत
(सिद्धिविनायक  - सिद्धटेक  )
 
सिद्धिविनायक (सिद्धटेक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे.अष्टविनायकांमधील हा तिसरा गणपती.

पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असुरांशी भगवान विश्णू अनेक वर्षे लढत होते. मात्र, त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला.

मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत
 
सकाळी ११:४५ - सिद्धटेक कडून रांजणगाव कडे निघालो . सिद्धटेक ते रांजणगाव जवळपास ८० किमी अंतर आहे रस्ता पण तितकासा चांगला नाही आम्ही विचारात विचारात निघालो तसा अल्पना google maps वर सारखं लक्ष ठेवून होती . सिद्धटेक वरून पुन्हा दौंड कडे येवून काष्टी कडे निघायचं तिथून नार्वी वरून Pipeline MIDC रोड वरून नगररोड वर यायचं . नगररोड वर डावी कडे वळलो कि लगेचच रांजणगाव येत 
 
दुपारी १:४५ - आम्ही रांजणगाव ला पोचलो . रांजणगाव चा महागणपती इथे दर्शनासाठी थोडी गर्दी होती पण १५ - २० मिनिट मध्ये आमचं दर्शन झालं . रांजणगाव चा मंदिर पण खूप छान आहे इथे महागणपती त्रिपुरासुराचा वध केल्याची गोष्ट चित्ररूपाने भिंतीवर चितारली आहे 
 
 
(महागणपती   - रांजणगाव  )
 
त्रिपूरासुर राक्षसाचा वध करण्यापूर्वी शंकराने गणपतीची येथे पूजा केली होती. हे मंदिर शंकराने बांधले असून त्याने उभारलेल्या गावाला मणिपूर असे नाव दिले.
या मं‍दिराचे बांधकाम नवव्या व दहाव्या शतकातील आहे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे रांजणगावच्या गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरात दिशासाधन केले आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची रचना आहे. त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व माध्यान्हकाळी गणेशाच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची, मोठ्या कपाळाची व आसनमांडी घातलेली आहे. मूर्ती अत्यंत मोहक असून दोन्ही बाजूला ऋद्धि-सिद्धी उभ्या आहेत. दरवाजापाशी जय व विजय हे दोघे रक्षक आहेत.
 
दुपारी २:३० - रांजणगाव मध्ये आम्ही lunch घेतला जेवण खूपच छान होतं . आता आम्ही plan पेक्षा बरच पुढे आलो होतो आजच्या दिवसातील फक्त थेऊर दर्शन बाकी होतं . थेऊर करून पुण्यात श्रीमंत दगडूशेट गणपती दर्शन करायचे ठरवले आणि तिथून तुळशीबागेत . तुळशीबागेत shopping चं नाव घेतल्या बरोबर रीना आणि अल्पनाच्या डोळ्यातील चमक बघण्यासारखी होती :-)
 
दुपारी ३:३० जेवण उरकून आम्ही आता थेऊर कडे निघालो driving seat वर आता अल्पना होती आणि रीना navigator मी, पराग आणि चंद्रशेखर मस्त मागे बसून प्रवास enjoy करत होतो . 
रांजणगाव ते थेऊर जवळपास ४० किमी अंतर आहे नगररोड वरून पुण्याकडे जाताना लोणीकंद वरून डावीकडे थेऊर ला रस्ता जातो 
 
दुपारी ४:३० - थेऊर च्या चिंतामणी चं आम्ही दर्शन घेतलं इथे पण दर्शनाला बिलकुल गर्दी नव्हती आज सकाळ पासून प्रत्येक देवळात खूपच छान दर्शन झालं . थेऊर ला आलो कि श्रीमंत माधवराव पेशव्यांची आठवण होते शेवट्या दिवसात ते थेऊर येथे होते. या गणपती समोरच त्यांची प्राणज्योत मालवली आणि रमाबाई इथेच त्यांच्या सोबत सती गेल्या . "स्वामी " कादंबरीतील माधवरावांच्या थेऊर मधल्या वास्तव्याच वर्णन वाचताना अंगावर अक्षरश काटा येतो 
थेऊर ला ह्या आधी २- ३ वेळा येवून गेलो होतो मी . मंदिराचे लाकडी मंडप खूपच सुंदर आहे 
 
 
(चिंतामणी  - थेऊर)
 
राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली.गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते चढवले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले
 
संध्याकाळी ५:०० -  आमचे पहिल्या दिवसातील अष्टविनायक दर्शन खूप प्रसन्न दर्शनाने पूर्ण झाले होते आता आम्ही पुण्याकडे निघालो 
 
संध्याकाळी ६:०० - पुण्यात संगमघाट वर गाडी पार्क केली आणि ऑटो ने दगडूशेट गणपती ला निघालो 
श्रीमंत दगडूशेट गणपती चं भव्य आकर्षक रत्नजडीत रूप पाहून मूर्ती वर नजर थीरावते . आज दगडूशेट गणपतीचं दर्शन पण पटकन झालं थोडा वेळ मंदिरात बसून अल्पना आणि रीना ला तुळशीबागेत सोडलं 
तिथेच नंतर चितळे बंधु च्या दुकानात बाकरवडी आणि इतर काही खरेदी करून वाकड ला घरी यायला निघालो 
रात्री ८:३० घरी आलो सगळे दमले होते पण पहिला दिवस खूपच छान झाला सगळं वेळे आधी आणि अतिशय सुंदर दर्शन . 
थोड्याच वेळात प्रसाद आणि प्रशांत पण घरी आले उद्या लेण्याद्री आणि ओझर करायचं आहे किरण आणि प्रसाद पण असणार उद्या सोबत 
मस्त गप्पा टप्पा करून १ वाजता झोपून गेलो . 
 
दुसरा दिवस - २१ डिसेंबर 
 
पहाटे ५:०० - सकाळी सगळे वेळेवर उठलो आणि आवरलं चंद्रशेखर किरण ला घेवून आला 
 
सकाळी ७:०० - वाकड वरून लेण्याद्री कडे निघालो ११० किमी चं अंतर आहे 
पुणे नाशिक रोड वर नारायणगाव वरून डावी कडे जुन्नर गावातून लेण्याद्री कडे जाता येतं 
पुणे नाशिक रोड वर सकाळी संस्कृती हॉटेल मध्ये नाश्ता करून आम्ही लेण्याद्री कडे निघालो 
 
सकाळी १०:०० - लेण्याद्री डोंगरच्या पायथ्याला पोचलो 
लेण्याद्री चा गिरिजात्मज, अष्टविनायकातील हा एकाच गणपती उंच डोंगरावर आहे पायथ्य पासून वर जायला २० -२५ मिनिटे लागतात 
 
(गिरिजात्मज  - लेण्याद्री )
 
 
पार्वतीने आपणास पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात १२ वर्षे तपश्चर्या केली. ही तपश्चर्या फलद्रूप होऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बटुरूपात प्रकट झाले. गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा आत्मज(पुत्र) म्हणून या गणपतीला 'गिरिजात्मज' हे नांव मिळाले.
 
पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते व त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये गणपती. बहुतेक सर्व लेण्यांसमोर ओसरी आहे. सहाव्या लेण्यातील चैत्य विहार अजिंठा-वेरूळची लेणी येथील नवव्या लेण्याशी मिळताजुळता आहे. चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत. हे खांब इ.स. पूर्व ९० ते इ.स. ३०० या सातकारणी कालखंडातील असल्याची नोंद आहे.
   
दुपारी १२:३० ला लेण्याद्री वरून खाली आलो . छान लिंबू सरबत घेतलं आणि ओझर कडे जायला निघालो 
लेण्याद्री ते ओझर जास्त अंतर नाही १५ किमी चा प्रवास आहे पूर्ण रस्त्याच्या बाजूने उस आणि द्राक्षाच्या बऱ्याच बागा आहेत 
 
दुपारी १:०० ला आम्ही ओझर ला आलो . इथे बऱ्याच ट्रिप च्या गाड्या आल्या होत्या त्या मुळे दर्शनाला थोडी गर्दी होती . ३० - ४० मिनिट मध्ये आमचं ओझर च्या विघ्नहर चं दर्शन झालं 
 

(विघ्नहर  - ओझर )
 
अष्टविनायकातला पाचवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा.
 
राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सूरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरवात केली. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांती घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे. विघ्‍नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला.
 
दुपारी २:०० वाजता मंदिरा समोरच्याच अष्टविनायक हॉटेल मध्ये जेवण केलं आणि शिवनेरी कडे निघालो 
 
ओझर वरून शिवनेरी सुद्धा जास्त दूर नाही २०-२५ मिनिट मध्ये आम्ही शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला पोचलो किल्ल्याच्या बऱ्याच वर पर्यंत गाडी जाते 
शिवनेरी म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराजांच जन्मस्थान 
 
दुपारी २:३० - शिवनेरी गड चढायला सुरुवात केली .  आज सुद्धा आम्ही केलेल्या plan प्रमाणे थोडं लवकर दर्शन उरकलं होतं शिवनेरी वरून ४:३० वाजे पर्यंत निघून देहू सुद्धा करायचं ठरवलं . 
 
शिवनेरी  खूपच सुरेख किल्ला आहे जागो जागो फुलांच्या बागा बनवल्यात , चांगली स्वच्छता ठेवली आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर आहे ह्या देवीवरूनच महाराजांचं नाव शिवाजी ठेवलं  
 
 
शिवाजी महाराज जन्मस्थान 

 
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपति शिवाजी महाराजांचा जन्म ह्याच ठिकाणी फाल्गुन वद्य तृतीय शके १५५१ (१९ फेब्रुवारी १६३० ) रोजी झाला 
 
ह्या स्थानाचे महत्व आयोध्येतील राम मंदिर किंवा मथुरेतील कृष्ण मंदिर एवढेच उच्च आहे माझ्या मते तरी काकणभर तरी सरसच आहे . 
 
महाराज्यांच्या जन्म स्थानास अभिवादन करून आम्ही गड बघायला निघालो  
 
 
 
 
 
 
गडावर एक बदामी टाक (तलाव ) आहे . कडेलोट टोक आहे , एक इदगाह आहे आणि जिजाबाई आणि बाळ शिवबाचा एक सुंदर पुतळा आहे .  नंतर मग शिवाई देवी च दर्शन घेतलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो 
 
दुपारी ४:३० - आम्ही शिवनेरी किल्ल्या वरून देहू कडे जायला निघालो , नाशिक रोड वरून पुण्याकडे जायला निघालो . देहू ला जाण्यासाठी आम्हाला चाकण वरून देहू रोड वर जायचं होत 
 
मंचर जवळ एक छोटा break घेतला चहा नाष्टा केला आणि मार्गस्थ झालो 
 
पण राजगुरुनगर जवळ एक तास traffic मध्ये अडकलो . उशीर झाला होता म्हणून देहू जाण्याचं रद्द करून सरळ पुण्याकडे निघालो 
आज रात्री किरण कडे dinner ला जायचं होत
 
रात्री ८:३० - किरण च्या घरी बालेवाडी ला गेलो . स्वाती ने खूप छान जेवण केलं होत . सगळ्यान बरोबर किरण ची मुलगी आराध्या ने पण धम्माल केली 
आज Colors वरच्या 24 serial चा शेवटचा episode होता तर सगळे ते बघत बसले आणि ११:३० ला किरण च्या घरून परत आलो 
आजचा दिवस पण खूप छान झालं लेण्याद्री आणि शिवनेरी चढायला लागल्या मुळे सगळे दमले होते आणि लवकरच झोपी गेलो 
 
 
तिसरा दिवस - २२ डिसेंबर 
 
 सकाळी ६:०० वाजता - आज थोडं आरामात उठलो . महड आणि पाली करायचं आहे . सकाळीच किरण चा फोन आला आज आमच्या बरोबर किरण ची  family पण येणार आहे . स्वाती आणि आराध्या सोबत आले 
 
सकाळी ८:०० - वाकड वरून महड कडे जायला आम्ही निघालो . महड कडे जायला मुंबई पुणे express way वरून खोपोली exit घ्यायचा खोपोलीत येवून जुना मुंबई रोड वरून सरळ पुढे यायचं ५ किमी वर महड लागत 
 
सकाळी ९:४५ - आम्ही महड ला पोचलो , आज रविवार महड ला भरपूर गर्दी होती दर्शनाची रांग बाहेर रस्तावर आली होती आम्ही दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो साधारण एका तासाने महड च्या वरदविनायकाचे दर्शन झाले 
अष्टविनायकातील हा एकमेव गणपती आहे ज्याचा जवळून दर्शन घेता येता . 
 


(वरदविनायक  - महड  )
 
पुरातन काळात महडचे नांव मणिपूर वा मणिभद्र होते. गुत्समद ऋषींनी या गणपतीची स्थापना केली असल्याची आख्यायिका आहे.वचकनवी नावाचे ऋषी होते. एकदा त्याच्या आश्रमाला राजा रूक्मांगदाने भेट दिली. त्यावेळी ऋषीपत्नी त्याच्या रूपावर मोहित झाली. तिने त्याला आपल्या आश्रमात बोलावले मात्र त्याने तिकडे जायला नकार दिला.हे देवांचा राजा इंद्राला कळाले तेव्हा त्याने रूक्मांगदाचे रूप घेऊन तिचा उपभोग घेतला. ऋषीपत्नी मुकुंदा हिला इंद्रापासून झालेला पुत्र म्हणजे गुत्समद. त्याला अनौरस पुत्र म्हणून हिणवले गेल्याने त्याने चिडून 'तू बोरीचे झाड होशील' असा शाप मातेला दिला, मात्र मातेला शाप दिल्याचे प्रायश्चित्त म्हणून गुत्समद ऋषिंनी मणिभद्र येथील अरण्यात 'ओम गंगणपतये नमः 'या मंत्र जपाने अनेक वर्षे घोर तपश्यर्या केली. त्यामुळे गणपती प्रसन्न झाले. त्यांनी गणपतीला 'इथेच राहून भक्तांची मनोकामना पूर्ण करावी' अशी विनंती केली. गणपतींनी आशिर्वाद दिल्या नंतर गुत्समद ऋषींनी गणपतीची स्थापना केली व त्याचे नांव वरदविनायक ठेवले.त्याला तेथे देऊळ सापडले तेच हे वरदविनायक देऊळ.
 
दुपारी १२: ०० महड ला दर्शन करून नाश्ता केला आणि पाली कडे जायला निघालो आमच्या अष्टविनायक यात्रेतील शेवटचा गणपती . महड पासून पाली ४० किमी आहे . परत खोपोली ला येवून तिथून खोपोली पेण रस्ता घायचा तिथून पाली फाट्यावर डावीकडे वळून Adlabs imagica च्या पुढे सरळ रस्ता पाली गावात येतो . मधला ८-१० किमी चा टप्पा खूप खराब आहे . एक तासाभरात आम्ही पाली ला पोचलो 
 
दुपारी १: ०० वाजता - पाली चा बल्लाळेश्वर गणपती आज इथे पण दर्शनासाठी विशेष गर्दी नव्हती , १०-१५ मिनिट रांगेत राहून दर्शन झाले 

( बल्लाळेश्वर - पाली )
 
कृत युगात येथे पल्लीपूर नांवाचे नगर होते. तेव्हा तेथे कल्याण नांवाचा वैशवाणी राहत असे. या कुटूंबात बल्लाळ नांवाचा सुपुत्र झाला. बल्लाळ लहानपणा पासून ध्यानधारणा व गणेशचिंतनात मग्न असे. अध्ययन व व्यापार न करता बल्लाळ भक्ती मार्गाला लागला व इतर सवंगड्यांनाही तेच करायला लावीत असे, म्हणून कल्याण शेठजींनी बल्लाळचा गणपती दूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले. नंतर बल्लाळने घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री गजाननाने विप्र रूपात प्रकट होऊन त्यांनी बल्लाळला बंधनातून मुक्त केले व त्याला वर दिला. बल्लाळाने विनायकाला विनंती केली की, आपण येथे कायमचे वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. तो वर बल्लाळाला देवून श्री गजाननाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. बल्लाळविनायक या नावाने श्रीगणेश येथील शिळे मध्ये अंतर्धान पावले. तीच ही बल्लाळेश्वराची मूर्ती आहे.
 
बल्लाळेश्वराचे दर्शन झाले आणि आमची अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली 
 
दुपारी ३:०० नागोठण्या जवळ lunch केला आणि सगळे पेणला आमच्या घरी आलो 
घरी थोडं थांबून सगळे मुंबई कडे निघाले , गोवंडी ला अल्पनाच्या घरून गाडी घेवून पराग रीना आणि प्रसाद बोरीवली ला गेले  . संध्याकाळी मी , किरण आणि स्वाती पुण्याला आलो . तीन दिवस जवळपास ९२५ किमी प्रवास करत श्री गजानना च्या कृपेने आमची अष्टविनायक यात्रा निर्विघ्नपणे पार पडली 
 
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
 
 
 

Monday, 8 July 2013

भेटी लागे जीवा - २०१३

श्री ज्ञानेश्वर माऊली पादुका 
 
 
नमस्कार माऊली ...
 
 
भेटी लागे जीवा लागलीसे आस |
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ||
 
आषाढी एकादशी -- पंढरीची वारीम्हणजे  वारकऱ्यांना  पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली असते तेवढीच आस त्या विठ्ठलाला भक्तांना भेटायची असते 
 
ह्या वर्षी ३० जूनला ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने प्रस्थान केलं आणि आषाढी एकादशीला हि वारी पंढरपुरी पोचणार . जवळपास २० दिवसांचा हा पायी प्रवास टप्प्या टप्प्याने पुढे सरकत असतो 
 
  तारीख
मुक्कामाचे ठिकाण
 
 
 
 
 
 
 
तारीख
मुक्कामाचे ठिकाण
३० जून
आळंदी
1 जुलै
बराड
जुलै
पुणे
१३ जुलै
नातेपुते
जुलै
सासवड
१४   जुलै
माळशिरस
जुलै
जेजुरी
१५ जुलै
वेळापूर
जुलै
वाल्हे
१६ जुलै
भंडीशेगाव
जुलै
लोणंद
१७ जुलै
वाकरी
जुलै
तरडगाव
१८ जुलै 
पंढरपूर 

१० जुलै
फलटण
 
 
गतवर्षी आम्ही पुणे ते सासवड असा वारी बरोबर पायी प्रवास केला होता अवर्णीय असा तो अनुभव आणि मग ह्या वर्षी पुढील टप्पा म्हणजे सासवड ते जेजुरी आणि जेजुरी ते वाल्हे असा वारी प्रवास करायचे ठरवलं 
माझा मित्र, चंदू (चंद्रशेखर श्रीखंडे) मागच्या वर्षीच बोलला होता वारीला येणार, अतुल तर होताच . शुक्रवार ५ जुलै ला पुण्यातून सासवड ला कार ने जायचं आणि तिथून पुढे वारी मध्ये सहभागी व्हायचं असा आम्हा तीघांचा प्लान ठरला  पुन्हा एकदा वारीतला अदभूत अनुभव घेण्यासठी आणि नवीन काही शिकण्यासाठी तयारी झाली . माझ्या कडील portable tent व्यवस्थित आहे कि नाही नाही पाहून घेतला . वारीसाठी पांढरे कपडे , टाळ , गांधी टोपी आणि इतरकाही तयारी झाली . गुरुवारी रात्री रात्री ठाण्यावरून चंदू माझ्या घरी आला 
 
शुक्रवार, ५ जुलै :
सकाळी ५:४५ वाजता माझ्या घरातून निघालो . ६ वाजता अतुल ला पिंपरी मधून pick केलं, खडकी चौकात गरमागरम चहा आणि क्रीमरोल घेतला  आणि सासवड  कडे मार्गस्थ झालो 
 
माऊलींची पालखी सकाळी ६ वाजता सासवड मधून निघते आणि सासवड गावातून फिरून जेजुरी कडे प्रयाण करते . आम्ही ७:३० ला सासवड मध्ये पोचलो तेंव्हा वारी मधल्या दिंड्या सोबतचे ट्रक निघाले होते त्यामुळे सासवड मध्ये entry करण्याचा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता . बाजूबाजूने  वाट काढत एकदाचे आम्ही अतुल च्या काकांचे घरी पोचलो आणि तिथे Car park करून वारी ला सामील होण्यासाठी निघालो 
 
मागच्या वर्षी आम्ही दिंडी क्रमांक ५५ मध्ये सामील झालो होतो ह्या वर्षी सुद्धा त्यांच्या सोबतच प्रवास करायचा होता . सासवड मध्ये नाश्ता (वडापाव) केला आणि सासवड जेजुरी वाटेवर चालायला सुरुवात केली . माऊलींची पालखी सासवड गावातून आधीच निघाली होती . थोडं पुढे गेलो आणि पालखी मागे ५५ क्रमांकाची दिंडी गाठली . मागच्या वर्षीचे सर्वच वारकरी ह्या वर्षी आले नव्हते , पेण अलिबाग तालुक्यांमध्ये पाऊसाची दमदार सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतीची कामे जोरात सुरु आहेत म्हणून ह्या वर्षी बऱ्याचश्या वारकर्यांना पूर्ण वारी मध्ये यायला नाही जमलं , ती मंडळी पेण ते आळंदी पर्यंत आली होती आणि माऊलींचा दर्शन घेवून परत गेली होती . तरी मागच्या वर्षीचे ओळखीचे बरेच जण भेटले आम्हाला पाहून त्यांना पण आनद झाला . त्यांच्या कडून समजला ह्यावर्षी दिंडी मध्ये रायगड जिल्ह्यातील वारकरी कमी असले तरी  नाशिक आणि नगर जिल्हातील मिळून जवळपास ५०० वारकरी आहेत . सर्वांना नमस्कार केला आणि माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी पुढे निघालो 
 
माऊलींचा रथ 
 
 
सगळ्यात पुढे माउलींच्या रथाचा नगारखाना असतो त्या मागे दिंडी क्रमांक २७ पाठोपाठ माऊलींचे घोडे असतात नंतर रथा  पुढील २६ दिंड्या आणि फुलांनी सजवलेला चांदीचा माऊलींचा पालखी रथ दोन डौलदार बैल ओढत असतात ह्या वर्षी DRDO ने Battery Operated Electronic रथ बनवला आहे त्यामुळे बैलांचे रथ ओढण्याचे कष्ट कमी झालेत . वारी मध्ये रथा पुढे २७ आणि रथा मागे १८९ अशा नोंदणीकृत दिंड्या असतात प्रत्येक दिंडी आप आपल्या क्रमांक नुसार रथाच्या पुढे अथवा मागे प्रवास करत असते कुठेच घाई गडबड नाही बेशिस्त नाही जगाच्या पाठीवर ४ ते ५ लाख लोकांचा इतक्या स्वयंशिस्तीने होणार वारी हा एकमेव इतका मोठा event असावा . माऊलींच्या रथाने विसावा घेवून निघाले कि सर्व दिंड्या क्रमांका नुसार एकमेकांपाठोपाठ चालू लागतात . त्यामुळे एखादा वारकरी गर्दीत चुकला तरी आपल्या क्रमांकाच्या दिंडीत सहजतेने परत येतो 
 
 
सकाळी १० : ०० माऊलींचा पहिला विसावा बोरावके  मळा येथे झाला , इथेच कला-दिग्दर्शक नितीन देसाई यांनीही हजेरी  लावली पालखी खांद्यावर उचलून घेत 'माऊली माऊली ' चा गजर केला 
 
"ज्ञानोबा - माऊली - तुकाराम ", " तो हा विठ्ठल बरवा  तो हा माधव बरवा " असे विविध अभंग म्हणत आम्ही सुद्धा वारकऱ्यां सोबत रणरणत्या उन्हात चालू लागलो . आपल्या कडे मुंबई कोकणात जबरदस्त पाऊस पडत असताना इथे सासवड च्या पुढे मात्र पाउसाचा टिपूस पण पडत नाही आहे . पाऊसाची कृपा ह्या भागांवर पण व्हावी हेच विठ्ठलाला साकडं . 
 
दुपारी १२ : ३० - शिवरी येथे वारी चा भोजनाचा मुक्काम, प्रत्येक दिंडी सोबत तंबू, जेवणाचे साहित्य याचे ट्रक असतात सकाळी लवकर हे ट्रक पालखीच्या पुढे निघतात आणि दुपारच्या जेवणाच्या मुक्कामी जावून थांबतात आणि आचारी दिंडी साठी भोजनाची तयारी करतात . आमची पण दिंडी जेवणा साठी थांबली आणि आम्ही वारी बघत थोडे पुढे निघालो 
मागच्या वर्षी पुणे ते सासवड प्रवासा दरम्यान खूप सारे हॉटेल होते पण ह्या वर्षी दिंडी मार्गावरचे जवळपास सगळे हॉटेल बंद होते कुठे हॉटेल आहे का शोधत आम्ही पुढे पुढे जात राहिलो शेवटी आज दुपारी वडापाव खावूनच जेवण करावं लागलं 
 
दुपारी ४ : ०० - साकुर्डे येथे माऊलींचा विसावा, प्रत्येक विसाव्याच्या जागी पालखीच्या दर्शनाला आसपासच्या गावातील लोकांची गर्दी जमते , साकुर्डेला आम्ही मिसळपाव आणि चहा घेतला आणि पुन्हा ५ ५ क्रमांकाच्या दिंडीत सहभागी झालो . 
वारकरी विसावा साठी दिंडीतून बाहेर निघताना आणि परत येताना दिंडी मार्गाला वंदन करून दिंडीत येतात . 
दिंडीत कोणही लहान थोर नाही सगळे सारखेच सगळ्यांचं एकाच नाव 'माऊली ' एकमेकांच्या आदराने पाया पडतात
 
 
दिंडी मार्गात जागोजागी स्वयंसेवी संघटना वैदकीय सेवा , खाद्य फराळ आणि इतर सेवा देत असतात . बरयाच ठिकाणी मोबाईल चार्जिंग करून देणारे दुकानं आहेत . जनरेटर वर ५ रुपयात वारकऱ्यांचे फोन चार्ज करून मिळतात , पण दिंडी मार्गात मोबाइल चा Network मात्र खूप busy मिळत , एकाच mobile cell मध्ये लाखो users आल्यामुळे सेवा खंडित होते . Service Provide कंपन्यांनी जर वारी काळात दिंडी मार्गातल्या Mobile Tower ची signal strength वाढवली तर वारकर्यांसाठी मोबाईल सेवा सुरळीतपणे देता येईल 
 
 
 
दिंडी मध्ये पुरुष मंडळी भजन आणि नामस्मरणात  रममाण झालेली असताना स्त्रियांनी सुद्धा 'ज्ञानोबा माऊली  तुकाराम ' ह्या ठेक्यावर ताल धरला होता 
 
संध्याकाळी ७ : ०० - दिंडी जेजुरी जवळ आली आणि वारकर्यांच्या भजन कीर्तनाचा उत्साह अजूनच वाढला , सकाळ पासून जवळपास २ ० किलोमीटर चालल्या नंतर सुद्धा विठ्ठलाच्या भजनात नाचण्याची इतकी energy ह्या वारकर्यांमध्ये कुठून येते हे चंदू बोलल्या प्रमाणे एक न सुटणारं गणित आहे . विठ्ठलाचं नामस्मरण आणि अपार भक्ती मुळे वारकर्यांना थकवा किंवा त्रास जाणवत नाही . 
 
 
जेजुरी मध्ये जवळपास सर्व मेडिया चांनेल्स चे वार्ताहार वारीचं वर्ताकन करायला हजर होते . 
 
आमच्या दिंडीच्या मुक्कामाचं ठिकाण जेजुरी पासून पुढे ४ किलोमीटर वर होतं , सकाळ पासून २ ० किमी चालून झालं होतं अजून ४ किमी जायचं होतं चालून चालून पाय दुखु लागले होते आणि पाठीवर च्या Bag मुळे पाठीला रंग लागली होती . कधी एकदा मुक्कामी पोचतोय असं झालं होतं . 
शेवटी रात्री ८ : ३ ० ला दिंडी मुक्कामी पोचलो , काही वारकरी पुढे आले होते त्यांनी गरमा गरम चहा दिला, चहा प्यायलावर थोडी तरतरी आली आणि आमचा तंबू लावला 
 
 
रात्री १० :००  - फक्त वडापाव आणि मिसळपाव खाल्या मुळे सपाटून भूक लागली होती . रात्रीचं जेवण दिंडी सोबतच केलं, वरण भात चवळीची भाजी सोबत पापड चटणी आणि आग्रहाच वाढणं छान जेवलो आणि पडल्या पडल्या निद्रेच्या अधीन झालो 
 
६ जुलै पहाटे ३:००  - " ओ पेणकर . . . . उठा पाणी जाईल " ह्या आवाजानेच जाग आली . वारकरी पहाटे लवकर उठतात कारण तंबू आवरून ट्रक ना पालखी निघायच्या आधी पुढील मुक्कामा साठी निघायचं असतं , आम्ही पण पहाटे उठलो "काकस्नान " केलं आणि थोडावेळ पुन्हा झोपलो 
 
सकळी ८:०० - माऊलींची पालखी जेजुरीतून सकाळी लवकरच निघाली पण आमचा मुक्काम जेजुरी पासून ४ किमी पुढे असल्यामुळे अजून आमच्या मुक्कामा पर्यंत पालखीचे रथ पोचले नव्हते 
 
दिंडीमार्गावर आलो, मी आणि अतुल ने नाश्त्याला पोहे - वडा घेतला, चंदू ने पुरी भाजी मागवली तितक्यात समोरूनच महाराष्ट्र प्रदेश भाजप चे अध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस दिंडी बरोबर चालताना दिसले , काल माजी वनमंत्री बबनराव पाचपुते सुद्धा दिसले होते, सुप्रिया सुळेनी दिंडी बरोबर दिवाघाटातून पायी प्रवास केला . सरकार आणि विरोधी पक्षातील नेत्यांना एकाच विनंती आहे आपण वारकर्यांसोबत पायी प्रवास करा, त्यांच्या बरोबर फुगडी खेळा , त्यांच्या आनंदात सहभागी व्हा , वारकर्यांना भौतिक सुखाची इछाच नसते ते आपल्या पांडुरंगालाच पालक मानतात ते सरकार कडून काहीच मागणार नाही पण जबाबदारी म्हणून वारकर्यांचा प्रवास व राहणं अगदी आरामदायी - सुखकारक नको पण त्यांना स्वच्छता आणि पाणी ह्या मुलभुत गरजांची सरकार ने सोय करावी 
 
सकाळी १०:००  - आम्ही आमच्या दिंडीपासून वारी मध्ये पुढे निघालो होतो , दौंडज च्या थोडा अलीकडे शेतामध्ये थोडा आराम केला . वाटेतच चंदू ने  दोन इरलं घेतली होती (इरलं म्हणजे प्लास्टिक चा कापड ज्याचा उपयोग वारकरी पावसापासून वाचण्यासाठी आणि आरामासाठी जमिनीवर अंथरण्यासाठी करतात) काळभोर शेत, चिंचेच्या झाडाची छान  सावली आम्ही पण इरलं अंथरल आणि थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा एकदा आमच्या दिंडी मध्ये सहभागी झालो 
 
आजचा मुक्काम वाल्हे ला होणार, वारकरी दिंडी मध्ये पंढरपूर पर्यंत जातात आणि आषाढी एकादशीला देवळाच्या कळसाच दर्शन घेवून परत फिरतात . वारकर्यांचा विश्वास आहे वारी दरम्यान पांडुरंग देवळात नसून वारी मध्ये असतो 
 
आमच्या दिंडीतील काही मंडळी आज रात्री वाल्हे वरून पुढच्या मुक्कामी लोणंद ला जाणार आणि तिकडून टेम्पो ने पंढरपूर ला देवळात जावून लोणंद ला पालखी बरोबर पुन्हा येणार . ह्या मंडळीना वाल्हे वरुन्सुद्धा पंढरपूर ला जाता आलं असतं पण त्यांना एकही टप्पा गाडी ने प्रवास नाही करायचा म्हणून आज रात्रीच चालत पुढल्या मुक्कामी जाणार 
 
सकाळी ११:००  - दौंडज ला पालखीचा विसावा आणि माऊलीच्या आगमनाचे पावसाच्या हलक्या सरींनी स्वागत केले . इथे अजिबत पाऊस पडत नाही पण जिथे जिथे माऊलींची पालखी विसाव्याला थांबते तिथे पावसाची एक सर येवूनच जाते जणूकाही माऊलीवर पावसाचा अभिषेक घालावा . 
 
दौंडज ला विसाव्याला आमची दिंडी दिंडीमार्गातून बाजूला झाली आणि आम्ही इथेच त्यांचा निरोप घेतला, पुढल्यावर्षी सुद्धा  या हे आग्रहाचा आमंत्रण स्वीकारलं आणि सर्वाना नमस्कार माऊली केलं 
आता आम्ही माऊलींच्या रथासोबत वाल्हे कडे निघालो 
 
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा 
पुण्याची गणना कोण करी 
 
असे अभंग म्हणत दुपारी १२ : ३० ला वाल्हे गावी पोचलो 
आद्यकाव्य रामायण रचणारे महर्षी वाल्मिकींचे हे गाव . इथूनच आम्ही पांडुरंगाला वंदन करतो आणि परतीच्या प्रवासाला लागतो 
 
रूप पाहता हो लोचनी | सुख झाले वो साजणी ||
तो हा विठ्ठल  बरवा | हा माधव बरवा ||
 
 
जेजुरी ते वाल्हे जवळपास १० - १२ किमी ची वारकर्यांची रांग असल्यामुळे वाल्हे तून जेजुरी कडे परत जाण्याचा मार्ग बंद होता, दुसरा मार्ग म्हणजे वाल्हे ते परिंचे गाव जाणें आणि तिकडून सासवड . 
बराच वेळ वाट पाहिल्यानंतर एक वडापवाला आम्हाला परिंचे गावी सोडायला तयार झाला, परिंचे गावाचा रस्ता हरिणे गाव वरून  जातो "हरिणे " हे अतुल चे मूळ गाव . 
परिंचे गावी पोचलो आणि तिथून 
सासवड ला जाण्यासाठी एक टेम्पो मिळाला आम्ही तिघे आणि अजून एक प्यासेंजर असे आम्ही चौघे दाटीवाटीने टेम्पो केबिन मध्ये बसलो , टेम्पो चालक पण बारामतीचा एकदम जिंदा दिल माणूस, टेम्पोत एकदम जोरात गाणी लावली होती आणि तो स्पीकर नेमका माझ्या कानाशी वाजत होता गाणं होतं   "वाढदिवसाला नको present मला . . . . . तुझ्या हाती गुलाबाचं एक फुल मला देशील काय । " :-)
(कोणाला हे गाणं सापडलं तर मला नक्की share करा )
 
सासवडला पोचलो छान जेवण केलं आणि अतुल च्या काकांच्या घरून कार घेवून पुण्याकडे परतीच्या प्रवासाला निघालो, अतुल ला पिंपरीला घरी सोडलं आणि चंदू आणि मी माझ्या घरी आलो, तिथून दोन दिवसाच्या वारीतील अवर्णीय अनुभव घेवून चंदू ठाण्याला निघाला आणि मी पेण ला


वारी मधील अजून काही फोटो -

https://picasaweb.google.com/106156735915030488638/PandhariWari2013?authkey=Gv1sRgCImz_IyTxfuvUw&noredirect=1
 
किशोर केशव झेमसे
zemasekk@gmail.com