Monday, 18 June 2012

भेटी लागे जीवा !!!

 

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल ।
देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल, पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल, गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला ।
म्हणुनि कळिकाळा पाड नाही ॥४॥

नमस्कार माऊली ...

पंढरीची वारी ... सातशे वर्षांची अविरत परंपरा, एक संस्कृती. खूप काही ऐकलं होतं, पाहिलं होतं पण कधी वारीचा अनुभव घेतला नव्हता.
बरयाच वर्षांची इच्छा होती एकदा वारी मध्ये सहभागी होऊन वारी काय आहे ते समजून घ्यावे पण वेळ येत नव्हती. अचानक एके दिवशी  इन्फोसिस मधील माझा सहकारी , मित्र  अतुल बोलला ह्या वर्षी वारी मध्ये जायचं आहे आणि अस वाटलं पांडुरंगाने अतुल च्या रुपात वारी साठी कॉल केला आहे आणि ह्या वर्षी  फुल ना फुलाची पाकळी समजून कमीत कमी २-३ दिवस तरी वारी मध्ये जावून येऊ आणि शुक्रवार १५ जून ते रविवार १७ जून वारी मध्ये सहभागी व्हायचं ठरवलं. वारी चा हा टप्पा पुणे ते जेजुरी पर्यंतचा मध्ये सासवड ला एक दिवसाचा विसावा. ११ जून ला आळंदीतून निघालेली ज्ञानेश्वर माउलींची वारी पिंपरी मध्ये पाहिला मुक्काम करून पुण्या मध्ये वस्तीला होती आणि सकाळी ६ वाजता पुण्यातून सासवड कडे मार्गस्थ झाली. पाठोपाठ देहू वरून निघालेली जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी होती.
  [जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी ]
 शुक्रवार, १५ जून - सकाळी ८:००
आम्ही ऑटो ने रेसकोर्स रोड ला आलो आणि समोरच तुकाराम महाराजांच्या पालखी चं दर्शन झाले. मनात पांडुरंगाला भेटण्याची आस..., टाळ-मृदंगाचा गजर आणि मुखी ज्ञानोबा-तुकारामांचे नाव अशा भक्तीमय वातावरणात भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन लाखो वारकरी वारीत सहभागी झाले होते. अवर्णनीय  भारावून टाकणारं भक्तिमय वातावरण तयार झालं होतं आणि ह्याच वातावरणात पुढचे ३ दिवस आमचा प्रवास सुरु राहणार होता.



[ज्ञानेश्वर माउली पालखी ]


"ज्ञानोबा माउली तुकाराम ..." लाखो वारकऱ्यांचा एका सुरात चाललेला हा गजर खरच मंत्रमुग्ध करून टाकतो.
तुकाराम महाराजांच्या पालखी पुढे श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी होती. हडपसर नंतर तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर महामार्गावरून पंढरपूरच्या दिशेने निघते आणि ज्ञानेश्वर माउलींची पालखी सासवड च्या दिशेने मार्गक्रमण करू लागते.


जसा देश तसा वेश, आयटी कल्चर मधले कडक इस्त्रीचे कपडे बदलून वारकऱ्यांचे पांढरा सदरा, डोक्यावर गांधी टोपी आणि कपाळाला चंदनी टिळा लावला आणि आपोआप मातीशी नाळ जोडली गेली.






दूर दूर वर नजर जात होती तिथपर्यंत भाविकांच्या हातातील भगवे पतके दिसत आहेत. तथाकथित सेक्युलरीसम ने भगव्या झेंड्या ला संकुचित केलं आहे. भगवा हिंदूच धार्मिक प्रतिक आहेच पण त्याच प्रमाणे आपल्या संस्कृतीचा प्रतिक आहे.. संताच्या सदभावनेच आणि वीरांच्या शौर्याचं प्रतिक आहे.






पुणे ते सासवड, वारीतील हा सर्वात मोठा टप्पा जवळपास ३५ किलोमीटर चा पायी प्रवास आणि मध्ये दिवे घाट.
दुपारी १२:३० - पुण्यातून निघाल्या पासून पहिली विश्रांती आम्ही दिवेघाटाच्या पायथ्याशी घेतली. माउलींची पालखी येथे घटका भर विश्रांती घेते. माझा मित्र दत्ता पाटील, त्याचे बाबा दरवर्षी नेमाने वारीला येतात. काल त्यांच्याशी बोलणं झालं होता. इथेच त्यांची भेट झाली आणि आम्ही त्यांच्या दिंडीत सहभागी झालो आणि इथूनच आमचा खरा वारीचा प्रवास सुरु झाला. माउलींच्या पालखी रथाला २ बैल जोडलेले असतात पण दिवे घाट चढून जाण्यासाठी इथे रथाला ७ बैल जोड्या जोडल्या जातात आणि पालखी सोहळा बघायला पूर्ण दिवेघाटात असंख्य जनसमुदाय जमा झालेला असतो.


जय जय राम कृष्ण हरी | जय जय राम कृष्ण हरी ||

                                                 तो हा विठ्ठल बरवा | तो हा माधव बरवा ||

असे विविध अभंग म्हणत आम्ही सुधा दिंडी सोबत चालत होतो.

दिंडी मध्ये लाखो भाविक आहेत पण कुठे गडबड नाही गोंधळ नाही, वारी सोबत जास्त पोलीस सुद्धा  नाहीत, इथे प्रत्येकजण स्वयंसेवक आहे, शिस्तबद्ध आहे. प्रत्येक दिंडीला नंबर दिलेला आहे आणि दिंडी त्याच क्रमांकाने चालत असते. आमचा दिंडी क्रमांक आहे ५५ ह्या दिंडीत जवळपास १२५ वारकरी आहेत . माउलींच्या रथाच्या पुढे २५ दिंड्या आहेत आणि रथाच्या मागे २००.

दिवे घाटातील दृश्य खूपच रोमहर्षक आहे पूर्ण घाटात वारकरी दिसत आहेत. सगळे मिडिया पण ते प्रक्षपण करण्या साठी घाट माथ्यावर उपस्थित होते.
जवळपास सगळे वारकरी पन्नाशी किंवा साठी ओलांडलेले आहेत पण त्यांचा उत्साह खरोखर वाखाणण्याजोगा आहे. मला आणि अतुल ला घाटामध्ये वारकर्यांच्या बरोबरीने चालणं पण कठीण जात होतं. पांडुरंगाला भेटण्याची आंतरिक ओढच ह्या सर्व वारकर्यांना इतकं चालायची शक्ती प्रदान करते.


वारीत कोणी दादा, काका, मामा, ताई, मावशी नाही सर्वांचे एकाच नाव "माउली". कोणी लहान मोठा नाही, सगळे लहानथोरांना "नमस्कार माउली" बोलत पाया पडतात. सामाजिक बंधुभाव, एकमेकांप्रती आदर हा वारीचा अविभाज्य हिस्सा आहे.




दुपारी ४:३० : दिवेघाट चढून वारी घाट माथ्यावर आली इथे पालखी साठी विसावा आहे. जागो जागी वेगवेगळ्या संघटना आणि लोकांनी वारकर्यांसाठी चहा, पाणी, खिचडी सारख्या फराळाची व्यवस्था केली आहे. थोडा विसावा घेवून आमची दिंडी आता सासवड कडे मुक्कामी निघाली आहे, इथून सासवड ८ किलोमीटर आहे.
जवळपास तीस ते चाळीस हजार लोकसंखेच सासवड गाव, आज इथे ५ लाख वारकरी वस्तीला येतात.
गावाच्या आजूबाजूला सगळी कडे वारकऱ्यांचे तंबू आहेत. प्रत्येक दिंडी सोबत ट्रक असतात त्या मध्ये राहायचे तंबू आणि जेवण बनवायचे साहित्य असते. दिंडी मुक्कामी जाण्याआधी हे ट्रक मुक्कामच्या ठिकाणी जावून तंबू टाकतात. प्रत्येक गावी प्रत्येक दिंडी ची तंबू लावण्याची जागा दरवषी साठी ठरलेली असते आणि दिंडी तिथे पोचण्याआधी तंबू लावून झालेले असतात. इतके काटेकोर नियोजन खचितच कुठे बघायला मिळेल.

रात्री ९:०० - सासवड मध्ये आम्ही दिंडी नंबर ५५ च्या मुक्कामी पोचलो आणि हि जागा माउलींच्या पालखी च्या मुक्कामाच्या अगदी बाजूलाच होती. आमच्या सोबत एक पोर्टेबल तंबू घेवून गेलो होतो. सर्व प्रथम आराम करण्या साठी तंबू टाकला. जवळपास ३५ किलोमीटर अंतर चालून आलो शरीर थकून गेलं होतं. "चालून चालून पायाचे तुकडे झाले ." ह्या ओळीचा शब्दश: अर्थ आज समजला होता. आमच्या ह्या तंबूचा दिंडीतील सगळ्या वारकर्यांना अप्रूप वाटत होतं. बरेच जण हा काय प्रकार आहे बघून गेले. त्याच बरोबर आम्ही वारी मध्ये आलो आहे ह्याचा पण सर्वाना कौतुक वाटत होतं. पुढचे दोन दिवस खूपच आपुलकी आणि जिव्हाळ्याने सर्वांनी आम्हाला सोबत घेतलं.
उद्याचा पूर्ण दिवस वारीचा सासवड ला मुक्काम आहे.
शनिवार १६ जून, सकाळचे ६:००: लवकरच जाग आली. आमच्या आधी सगळे वारकरी उठून तयार झाले होते. आम्ही पण सकाळचे आन्हिक उरकून घेतले. पाय अजून हि दुखत आहेत पण आज दिवसभर आराम करायचा आहे. सकाळीच दिंडीतील वारकर्यांनी भजनाची बैठक बसवली आणि आम्ही पण त्यांच्यात सामील झालो.
रूप पाहता हो लोचनी | सुख झाले वो साजणी ||
तो हा विठ्ठल | बरवा तो हा माधव बरवा ||
**
बोलवा विठ्ठल पाहावा विठ्ठल | करावा विठ्ठल जीवभाव ||
येणे सोसे मन झाले हावभरी | परत माघारी नेत नाही ||

टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग गाताना मन आनंदुन जात. आपण हाय बिट्स गाणी ऐकतो.... डिस्क मध्ये जातो.. धकाधकीच्या जीवनात अशा प्रकारे एक "kick " हवी असते. टाळ मृदुंगाच्या आवाजात ती "kick " अनुभवायला मिळते.

वारीच्या मुक्कामी बऱ्याचश्या सेवाभावी संघटना वारकर्यांसाठी मेडिकल सेवा, पाणी पुरवीत असतात. एक गोष्ट जाणवली वारकर्यांची सरकार कडून काहीच अपेक्षा नाही आहे, पण सरकारने एक कर्तव्य म्हणून तरी वारकर्यांना काही जुजबी अत्यावश्यक सेवा पुरवायला हव्यात पण इथे सुद्धा अपेक्षाभंगच झाला.


शनिवार संध्याकाळ - पूर्ण सासवड शहरत वारकर्यांचे तंबू उभे आहेत आणि परतेक दिंडी मध्ये पांडुरंगाचे अभंग, हरिपाठाचे पारायण सुरु आहे. आजचा सासवड चा मुक्काम उरकून उद्या सकाळी पालखी जेजुरी कडे प्रयाण करणार.

रविवार १७ जून, पहाटे ३:०० - सगळे वारकरी पहाटे लवकर उठतात, तंबू मोडून समान ट्रक मध्ये भरतात आणि ट्रक पालखी निघायच्या आधी पुढच्या मुक्कामी रवाने होतात.

पहाटे ४:०० - ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी समोर छान काकड भजन सुरु आहे. माउलींच्या दर्शन साठी वारकर्यांनी रांग लावली आहे. आम्ही सुद्धा आमचा समान आवरून ठेवलं आहे आणि पुन्हा एकदा वारी मध्ये सामील होण्यासाठी तयार आहोत.

सकाळी ६:०० - माउलींचा रथ तयार झाला आहे. आम्ही खरच नशीबवान माउलींच्या रथाच्या इतक्या समीप राहायला मिळाला आम्हाला. सकाळीच माउलींच्या स्वागतासाठी वरुणराजाच आगमन झालं. वारकर्यांची मात्र धांदल उडाली, पाऊसात वारी करण्यासाठी त्यांच्या कडे प्लास्टिक चे इरलं असतं.








सकाळी ७:३०: माउलींच्या पालखीचं सासवड वरून प्रस्थान झाला. विठू नामाचा गजर करीत पालखी सासवड गावातून जेजुरी कडे चालू लागली. जेजुरी कडे जाताना एक रस्ता नारायणपूर कडे जातो. ह्याच रस्त्यावर वारीला राम राम करून परतीच्या प्रवासाला निघतो आणि इथूनच आमचा पांडुरंगाच्या चरणी नमस्कार

भेटी लागे जीवा लागलीसे आस | पाहे रात्रंदिवस वाट तुझी ||

तुझे भक्ती सुख द्यावे मज प्रेम | वसो तुझे नाम माझे चित्ती |
सुभाक्ती विचार राहो माझे चित्त | हीच कृपा मूर्ती द्यावी मज |
तुझी दास जागी म्हणवितो विख्यात | पसरवला हात फिरवू नको |
नाम म्हणे देवा द्यावे इतके मज | ऐकुनी केशवराज होय बोले |
भेटी लागे जीवा लागलीसे आस | पाहे रात्रंदिवस वाट तुझी ||



किशोर केशव झेमसे
zemasekk@gmail.com

8 comments:

Unknown said...

Khupach Chhan Raje!!! India made aalyawar nakki janar aata :)

Chandrashekhar A Shrikhande said...

Tufan yaar... Labhale tumhas Bhagya..Pudhlya Varshichi hur hur lagli yaar aatach...

Chandan Yadav said...

Too Good Mitra..Khupach chan., Next year apan sagale plan karun jau..

Dr.Sapna said...

sahich kishor!! maze aajoba varakari hote.. each yr vari karayche.. I hope mala pan bhagya labhel varila jayach :)

ats said...

apratim lekh!!!!!!!!!!

Aarti V. Avsare said...

Khupach surech mitra.... Photos pan tuch kadhalele distayt.. te hi chan..
Sakshat anubhavale ase vatale...
Aprateem!!!!

Bola pundalik varde .. hari vitthal..

SaHaKa said...

Lai bhari !! As always I am a fan of yours !

Mandar S. Velankar said...

Khupach chan! Chan vatale ki aaplya aatachaya generation madhun tumhi tari interest gheun sahabhagi zalat , it's great!